काँग्रेसचा दुहेरी फॉर्म वाद पेटला

निष्ठावान कार्यकर्त्यांचा अवमान; पक्षात नाराजीची ठिणगी

दर्यापूर /18 नोव्हेंबर : गोर-गरिबांसाठी सतत झटणार्‍या आणि काँग्रेसच्या भूमिकेवर ठाम राहून काम करणार्‍या कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. एका प्रभागात दोन वेगवेगळ्या उमेदवारांना -इ फॉर्म देण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये संभ्रम आणि नाराजीची लाट उसळली आहे.
पक्षाने आधी एकनिष्ठ व मेहनती कार्यकर्त्याला अधिकृत फॉर्म दिल्यानंतर, त्याच प्रभागात पुन्हा दुसर्‍या उमेदवाराला फॉर्म देण्याची गरज काय? असा सवाल कार्यकर्त्यांकडून सातत्याने पुढे येत आहे. पहिला फॉर्म दिला, तर दुसरा का? हा निर्णय नेमका कोणाच्या प्रभावाखाली? अशा चर्चांनी पक्षातील वातावरण अधिक तापले आहे. या निर्णयामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत झाला असून, ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी मेहनत घेतली त्यांनाच न्याय न मिळाल्याची खंत मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये वाढत चाललेली नाराजी थेट निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम करू लागल्याचे निरीक्षक सांगतात. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या सौ. मंदाकिनी सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या प्रचारमोहीमेलाही या अंतर्गत गोंधळाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील असंतोषाचा भडका वाढल्यास मतपेटीत त्याचे थेट परिणाम दिसू शकतात, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पातळीवरून योग्य वेळी समन्वय न साधल्यास या दुहेरी निर्णयाचे गंभीर पडसाद काँग्रेसला भोगावे लागू शकतात. आता या नाराजीनंतर पक्ष नेतृत्व कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button