प्रीती बंड शिंदे गटाच्या स्टार प्रचारक
महत्त्वाची जबाबदारी

अमरावती / 18 नोव्हेंबर – आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 चे राजकीय वातावरण तापू लागले असताना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी आपल्या स्टार प्रचारकांची अधिकृत सूची जाहीर केली आहे. या सूचीत जिल्ह्यातील सक्रीय महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणार्या उपनेत्री प्रीती संजय बंड यांची स्टार प्रचारकपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षनेते
एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाने ही सूची प्रसिद्ध केली. पक्षाकडून
मिळालेल्या
माहितीनुसार, जनकल्याणकारी उपक्रम, संघटन विस्तार, तसेच आगामी निवडणुकांमध्ये मतदारांपर्यंत स्पष्ट आणि विश्वासार्ह संवाद पोहोचवणे, या उद्देशाने या स्टार प्रचारकांची निवड करण्यात आली आहे. प्रीती बंड यांच्या सामाजिक कार्यातील सातत्य, महिला प्रश्नांवर केलेले अभ्यासपूर्ण प्रयत्न, तसेच गेल्या काही वर्षांतील त्यांच्या राजकीय सक्रियतेमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे. जिल्ह्यातील अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतल्याने आणि अनेक सामाजिक संघटनांशी सातत्याने संपर्क राखून काम केल्याने, त्यांची प्रतिमा सशक्त महिला नेतृत्व म्हणून अधिक दृढ झाली आहे. त्यांचा संवादकौशल्य, तळागाळातील संपर्क आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊनच त्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पक्षाच्या उद्धिष्टांचा प्रचार, स्थानिक प्रशासनातील त्रुटींबाबत जनजागृती, तसेच पक्षाच्या उमेदवारांना संघटनात्मक बळ मिळवून देणे, या सर्व स्तरांवर बंड यांची महत्त्वपूर्ण भूमिका अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांतील वातावरण लक्षात घेतल्यास, पक्षाच्या रणनीतीत महिला नेतृत्वाचा सहभाग वाढवणे ही मोठी गरज होती, आणि त्यासाठी प्रीती बंड सारख्या कार्यकर्त्याकडे नेतृत्वाची क्षमता असल्याचे पक्षातील अनेक पदाधिकार्यांचे मत आहे.
प्रीती संजय बंड यांची प्रतिक्रिया-पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. पक्षाने निवडणुकीसाठी सक्षम व लोकाभिमुख उमेदवार उभे केले असून, मतदारांचा व्यापक पाठिंबा मिळेल, याची मला खात्री आहे. जिल्ह्यात भगवा आणि धनुष्यबाणाचे वातावरण अधिक दृढ होण्यासाठी मी तळागाळात व्यापक संवाद साधणार आहे. शैक्षणिक उन्नती व क्रीडांगणांवरील अतिक्रमण हटवणे ही कामे माझ्या प्राधान्यक्रमात राहतील.




