शिंदे गटाचा दावा : अचलपूर, अंजनगाव, वरुड, मोर्शी येथे आमचेच नगराध्यक्ष निवडून येणार

आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली

शिवसेना निवडणुकांसाठी सज्ज

अमरावती / 14 नोव्हेंबर – अमरावती जिल्यातील नगरपरिषद आणि पंचायत निवडणुकांसाठी शिंदे गटाची शिवसेना तयारीत असून अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, मोर्शी आणि वरुड या नगरपरिषदांमध्ये धनुष्यबाणचे नगराध्यक्ष निवडून येतील, असा दावा शिवसेना नेते माजी आमदार ज्ञानेश्वर धाणे पाटील आणि नेत्या प्रीती संजय बंड यांनी केला.
दोन्ही नेत्यांनी सांगितले की जिल्यात शिवसेनेचे जनसमर्थन वाढत आहे. पूर्व केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या बैठक, नियोजन आणि कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे. सर्व विभागांत निवडणूक तयारी जोरात करण्यात येत आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून आणि परिस्थितीचा विचार करून उमेदवारांची निवड केली जात आहे. नामांकनाची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असल्याने शिवसेना लवकरच सर्व उमेदवार जाहीर करणार आहे, अशी माहिती धाणे पाटील यांनी दिली.काही ठिकाणी काँग्रेससोबत थेट सामना होणार असून काही ठिकाणी मित्रपक्षांशीही स्पर्धा होईल. मात्र जिल्यातील परिस्थिती पाहता शिवसेना चांगली कामगिरी करेल, असा विश्वास प्रीती बंड यांनी व्यक्त केला. नगरसेवक पदांसाठी उमेदवारांची निवडही अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत सर्व नावांची घोषणा केली जाणार आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत असल्याने शिवसेना या निवडणुकांत मजबूत कामगिरी करेल, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button