अकोल्यातील तीन बेपत्ता अल्पवयीन मुली अंजनगावात सुखरुप
कुटुंबियांच्या रागावर घर सोडले

अंजनगाव सुर्जी / 3 जून : अकोल्यामध्ये 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या महागाव या गावातून या मुली बेपत्ता झाल्या होत्या. अचानक मुली गायब झाल्यामुळे अकोला जिल्हा हादरला होता. पण अखेर या तिन्ही मुलींचा शोध घेण्यात अकोट ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अमरावती जिल्ह्यात या तिन्ही मुली सापडल्या असून त्यांना अकोल्यात नेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील महागावमध्ये राहणार्या 3 मुली अचानक बेपत्ता झाल्या. त्यामुळे त्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला. या मुलींना कुणी नेलं, त्या कुठे निघून गेल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा जिल्ह्यात सुरू झाल्या होत्या. पण पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या सर्व मुलींना शोधून काढले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील कार्ला शेतशिवारात या मुली सुखरूपपणे मिळून आल्या. तिन्ही मुली 11 ते 13 या वयोगटातील आहेत. तिघींही शाळेमध्ये जातात. घरचे रागावल्यामुळे या मुली रागाच्या भरात घर सोडून निघून गेल्या होत्या. मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मुलींच्या शोधार्थ पोलिसांचे 2 पथके तयार करण्यात आले होते. पोलिसांच्या पथकाने काही तासांत या मुलींना शोधून काढले.
अकोट तालुक्यातील जवळपास 25 ते 30 गावांत पोलिसांनी या मुलींचा शोध घेतला. अखेर या तिन्ही मुली अमरावती जिल्ह्यातील एका गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मुलींना ताब्यात घेतलं. सद्यस्थिती या मुलींना अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.