प्रतिबंधित बोगस बियाणे विक्रीचा सुळसुळाट
अमरावती विभागात 12 ठिकाणी कारवाई

-शेतकर्यांना गंडविण्याचा प्रयत्न
-मोठे रॅकेट असण्याचा संशय
अमरावती/ 3 जून: खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे खरेदीची लगबग सुरु झाली आहे. यातच प्रतिबंधित असलेल्या बोगस बियाणे विक्रीचा देखील सुळसुळाट पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागात एचटीबीटी प्रतिबंधित असलेल्या बोगस कपाशी बियाणांचा मोठा साठा आढळून आला आहे. गेल्या तीन आठवड्यांत विविध पथकांनी 12 ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्यात आली आहे. तर यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. शेतकर्यांकडून खरेदीला देखील सुरवात करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी प्रतिबंधीत असलेल्या एचटीबीटी कापसाचे बोगस बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यातून शेतकर्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने अमरावती विभागात मोठी कारवाई केली जात आहे.
दरम्यान गुजरात राज्यातून बोगस बियाणे येतं आहे. त्याच्या पाठीमागे कोण आहे? गुन्हे दाखल होतात, मात्र त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? खर्या आरोपींपर्यंत पोलीस का पोहोचत नाही? पोलिसांनी याचा आका शोधणे गरजेचे आहे. कारण ही बियाण्याची कंपनी गुजरातच्या कोण्या बड्या नेत्याची आहे का? असा सवाल अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पत्र लिहिले आहे, शेतकर्यांना फसवणार्या गुजरातच्या कंपनीवर कडक कारवाई करा अमरावती पोलिसांनी गुजरात मध्ये जाऊन याचा तपास करावा अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे.
-62 लाखाचे बोगस बियाणे जप्त
मागील तीन आठवड्यात 12 ठिकाणी छापेमारी करत कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणाहून तब्बल 4 हजार 429 बियाणांची पाकिटे व 800 किलो खुले बियाणे जप्त करण्यात आले आहे. त्यांची एकूण किंमत 62 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवले आहेत. या बोगस बियाणांचे धागेदोरे गुजरात व प्रामुख्याने अहमदाबाद परिसराशी जुळलेले आहेत.