मॅट्रिमोनी साइटवर सायबर फसवणूक

युवतीकडून 2.35 लाखांची लूट; न्यूयॉर्कच्या डॉक्टरचे खोटे आमिष

अमरावती / 7 नोव्हेंबर सायबर गुन्हेगार आता मॅट्रिमोनी साइट्सलाही सुरक्षित न ठेवता सर्रास फसवणूक करत आहेत. अशाच एका प्रकरणात अमरावतीतील एका युवतीची 2 लाख 35 हजार 133 रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली. गाडगेनगर पोलिसांनी 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
गाडगेनगरातील पीडित युवतीने काही दिवसांपूर्वी मॅट्रिमोनी अ‍ॅपवर प्रोफाइल तयार केले होते. त्यानंतर स्वतःला न्यूयॉर्कमध्ये कार्यरत डॉक्टर म्हणून ओळख सांगणार्‍या 34 वर्षीय व्यक्तीने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याने आपले नाव डॉ. सुनीत भूमर असे सांगून संवाद सुरू केला. सध्या सिरियात करारावर काम सुरू असल्याचे भासवत तो सतत तिच्याशी संपर्कात राहू लागला. संवादाचा ताण वाढताच आरोपीने तिचा विश्वास संपादन केला आणि हळूहळू पैशांची मागणी सुरू केली.
खोट्या खात्यांचे आमिष; पैसे घेताच आरोपी झाला गायब-आरोपीने भारतात येण्याचे तसेच भारतातील बँकेत त्याचे 38 कोटी रुपये असल्याचे सांगून युवतीकडून 5 लाख रुपये मागितले. तिचा विश्वास बसल्याने तिने रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर सिरियातून बाहेर पडण्यासाठी कागदपत्रांसाठी 1 लाख 33 हजार 178 रुपये आणि ‘कॅश दाखवण्यासाठी’ 57 हजार 773 रुपये अशी पुन्हा मागणी केली. युवतीने सर्व रक्कम पाठविल्यानंतर आरोपीचा फोन अचानक ‘नॉट रिचेबल’ झाला. त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याची जाणीव होताच युवतीने गाडगेनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button