राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती

अचलपूर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहम्मद इम्रान शेख रहिम यांची

अचलपूर /2 जून: अचलपूर येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहम्मद इम्रान शेख रहिम मौलाना (हिरापूरा) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमरावती ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एका विशेष समारंभात पार पडली, ज्यात पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संतोषदादा महात्मे, ज्येष्ठ नेत्या आणि प्रभारी सुरेखाताई ठाकरे, जिल्हा संघटक प्रमुख सईद भाई, भातकुली तालुकाध्यक्ष नईम भाई, युवक अध्यक्ष अभिजीत गावंडे, संपर्क प्रमुख श्याम भाऊ डवले आणि मोहम्मद तौसीफ (परतवाडा) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी डॉ. इम्रान यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या सामाजिक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
या वेळी बोलताना संतोषदादा महात्मे म्हणाले, डॉ. मोहम्मद इम्रान हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांनी अचलपूर परिसरात अनेक वर्षे समाजहितासाठी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन अधिक बळकट होईल आणि कार्यकर्त्यांच्या समस्या प्रभावीपणे सोडवता येतील.
या नियुक्तीमुळे अचलपूर व आसपासच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्षाने कार्यकर्त्यांना संधी देत नेतृत्व घडविण्याचा जो विचार केला आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही या वेळी स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या

Back to top button