प्रशांत किशोर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

3 दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

पटना /28 ऑक्टोबर :बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान जन सुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांच्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चर्चा आहे की प्रशांत किशोर हे दोन राज्यांचे मतदार आहेत, ज्यामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. या दाव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने या प्रकरणात पुढील तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने प्रशांत किशोर यांचं नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या यादीत त्यांचं नाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमानुसार, एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी करता येत नाही आणि या नियमाचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या

Back to top button