कुणीही अशी अहंकाराची भाषा वापरली नाही
यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवर राणांचे प्रत्युत्तर

अमरावती /27 ऑक्टोबर – बडनेराचे आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त किराणा पिशवी पाठवल्यानंतर ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त करत राणांवर टीका केली. त्यावर आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, आपण दरवर्षी यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या किराण्याची पिशवी पाठवतो, पण यावर्षी त्यांनी दिलेल्या भेटवस्तूंचा अनादर करून आपल्यावर अनेक आरोप केले. इतरही नेत्यांना आपण किराणा आणि भेटवस्तू पाठवल्या, पण कुणीही अशा प्रकारची अहंकाराची भाषा वापरली नाही. त्यांच्या वक्तव्यात द्वेष दिसून येतो, अशी टीका रवी राणा यांनी केली.
रवी राणा म्हणाले की, यशोमती ठाकूर माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी त्यांचे वक्तव्य ऐकले आणि त्यांनी माझ्या पाठवलेल्या किराण्याचा कडाडून विरोध केला. पिशवीतील वस्तू एकेक करून दाखवताना त्यांनी सांगितले की, मी मोठ्या घरची मुलगी आहे, मी जमीनदार आहे, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि मला या किराण्याची गरज नाही. पण आम्ही जो किराणा घरी वापरतो, तोच नागरिकांना वाटप करतो आणि अनेक वर्षांपासून किराणा भेट म्हणून देतो. यशोमती ठाकूर यांच्या घरी देखील अनेक वर्षांपासून एक फराळाची किट आणि एक किराण्याची किट पाठवली जाते. एका भावाकडून बहिणीला आपुलकीच्या भावनेतून भेट देणे ही परंपरा आहे, आणि त्यांनी या भेटीचा विरोध केला हे दुर्दैवी आहे.
रवी राणा पुढे म्हणाले की, यशोमती ठाकूर यांनी आपल्यावरही निराधार आरोप केले. मी स्वतः गरिबीचे दिवस पाहिले आहेत, पण आता माझ्याकडून जेवढे शक्य आहे तेवढे लोकांना देतो. लाखो बहिणींना साड्या आणि भेटवस्तू दिल्या गेल्या असून त्यांनी त्या आनंदाने स्वीकारल्या. ठाकूर यांनी विरोध केला, याची मला चिंता नाही. केवळ यावर्षीच नाही, तर दरवर्षी मी दिवाळीनिमित्त फराळ आणि किराण्याची पिशवी यशोमती ठाकूर यांच्या घरी पाठवतो. पण यावेळी त्यांनी जी भाषा वापरली, त्यातून त्यांचा अहंकार दिसून येतो. खासदार बळवंत वानखेडे, अनेक आमदार आणि माजी नगरसेवकांनाही आपण दिवाळी निमित्त भेटवस्तू पाठवल्या, परंतु कुणीही अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली नाही. यशोमती ठाकूर यांनी दिलेल्या भेटवस्तू स्वीकारायला हव्या होत्या, असेही रवी राणा म्हणाले.




