राणा दाम्पत्याच्या किराणा भेटीवरून यशोमती ठाकूर संतप्त

औकातीत राहा, यशोमती ठाकूरांचा राणा दाम्पत्यावर निशाणा

* अमरावतीत दिवाळीच्या निमित्ताने नवा वाद

अमरावती /26 ऑक्टोबर : दिवाळीच्या सणानिमित्त अमरावतीत राजकारण पुन्हा तापले आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी थेट व्हिडिओ संदेशाद्वारे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर संताप व्यक्त केला. रविवारी राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांच्या निवासस्थानी किराण्याची थैली पाठवली गेली, मात्र त्या वेळी ठाकूर घरी नव्हत्या. राणा दाम्पत्य दरवर्षी दिवाळीत हजारो गोरगरीब कुटुंबांना किराणा वाटप करतात आणि यंदा त्यातील एक थैली यशोमती ठाकूर यांच्याकडे पाठवली गेली. तथापि, या थैलीसह फोटो काढण्याची मागणी करण्यात आल्याने ठाकूर संतापल्या.

ठाकूर म्हणाल्या की, माझ्या घरी शंभर रुपयांची साडी आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य पाठवून आमचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे साहित्य पोषण आहारातून आलेले असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आधीच काळी गेली असून त्यांना अजून अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत. तुम्ही आमचा अपमान करून काही साध्य करणार नाही. मी प्रतिष्ठित घरातील मुलगी आहे, असे चिल्लर धंदे आम्ही करत नाही. बापजाद्यांनी कधी बारदाना चोरला नाही. तुम्ही औकातीत राहा, नाहीतर उत्तर मिळेल!

त्या पुढे म्हणाल्या की, अमरावती हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचा जिल्हा आहे, येथे हलकट वर्तन चालणार नाही. मी कधी पक्ष बदललेला नाही, पण तुम्ही सत्तेसाठी रंग बदलता. यापुढे जर राणा दाम्पत्याने असे वर्तन केले, तर आम्ही थेट योग्य प्रत्युत्तर देऊ. ठाकूर यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांची दिवाळी आधीच काळी गेली आहे, त्यामुळे जे काही मदत किंवा किराणा द्यायचा असेल, ती थेट संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी नेऊन द्यावी. अनुदान मिळालेले नाही आणि पैसे थकले आहेत, अशा भानगडी फक्त अपमानासमान आहेत.

राणा दाम्पत्याकडून दरवर्षी हजारो गोरगरीब कुटुंबांना थैल्या वाटप केल्या जातात. यंदाही हजारो कुटुंबांना थैल्या वाटप करण्यात आल्या, परंतु ठाकूर यांच्या घरी थैली पोहोचवल्यानंतर फोटो काढण्याची मागणी झाल्याने त्या संतापल्या. या घटनेनंतर दिवाळीच्या सणाच्या रंगात राजकीय संघर्षाची छटा भरली असून ठाकूर यांनी स्पष्ट इशारा दिला की, हलकटपणा, पक्षबदल किंवा सत्तेसाठी रंग बदलणे चालणार नाही आणि यापुढे अशा प्रयत्नांना थेट प्रत्युत्तर दिले जाईल.

संबंधित बातम्या

Back to top button