‘समृद्धी’वर उत्तर प्रदेशचा अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी कट्ट्यासह चार जीवंत काडतुस जप्त

बुलढाणा /23 ऑक्टोबर : लहान-मोठ्या अपघातांनी गाजत असलेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक समृद्धी दृतगती महामार्ग आता गुन्हेगारीच्या घटनांमुळेही चर्चेत आहे. विविध कारणांमुळे हा मार्ग अपराधींना ‘आवडीचा’ ठरला आहे. पोलिसांच्या अश्याच कारवाईत उत्तरप्रदेशातील अट्टल गुन्हेगार जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल आणि चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, उत्तर प्रदेशातील दरोडा, लूटमार, टोळीयुद्ध (गँग वॉर) यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे.

गुन्हेगारास लोणार तालुक्यातील बिबी पोलीस पथकाने सतर्कतेने जेरबंद केले. समृद्धी महामार्गावर ही थरारक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यात नियमित 24 तास पेट्रोलिंग सुरु आहे. त्यानुसार बिबी पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी गस्त घालत असताना समृद्धी महामार्गावरील नागपूर-मुंबई लेनवर खळेगाव शिवार (तालुका लोणार) येथे एका आयशर वाहन चालकास संशयास्पद म्हणून थांबवले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, त्यावेळी चालकाने खोटे नाव सांगितले.

सखोल चौकशीत त्याचे खरे नाव अदिल उर्फ मेराज मो मुस्तकीम (रा. सोभीपूर, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश) समोर आले. आरोपीच्या अंगझडतीत त्याच्या खिशातून दोन जीवंत काडतुसे मिळाले. संशय बळकावल्याने त्याची बॅग तपासली असता, त्यात एक सिल्वर रंगाची देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे सापडले. पथकाने आरोपीकडून एक देशी कट्टा, चार जीवंत काडतूस, मोबाईल, वाहन आणि रोख रक्कम जप्त केली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button