नक्षल्यांचा नेता भूपतीसह 60 नक्षल्यांचे आत्मसमर्पण

विविध राज्यात दहा कोटीहून अधिक बक्षीस

* 16 ला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर शस्त्र खाली ठेवणार

गडचिरोली /14 ऑक्टोबर : दीर्घकाळ नक्षल चळवळीशी सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेते मल्लोजुला वेणु गोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यांनी अखेर आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विविध राज्यांत मिळून दहा कोटींपेक्षा अधिक बक्षीस होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर तो शस्त्र खाली ठेवणार असल्याचे सांगितले आहे. भूपती हा नक्षलवादी संघटनेचा प्रभावशाली रणनीतिकार मानला जातो आणि अनेक वर्षे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आणि संघटनेच्या शीर्ष नेतृत्वात मतभेद वाढले होते. भूपतीने ‘सशस्त्र संघर्ष’ निष्फळ ठरल्याचे मान्य करून शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले होते. त्याच्या मते, जनाधार घटला आणि शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याने संघर्ष नव्हे तर संवादच पर्याय आहे. भूपतीच्या या भूमिकेला काही नक्षल नेत्यांनी विरोध केला आणि महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणून शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर भूपतीने संघटनेतून बाहेर पडल्याची घोषणा केली आणि अखेर आपल्या साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या आत्मसमर्पणाची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेली नाही, तरी गडचिरोली पोलिस दलाच्या सूत्रांनी या हालचालींची माहिती दिली आहे.

* नक्षल चळवळीचा शेवट?

राज्य सरकारच्या आत्मसमर्पण धोरणामुळे नक्षल चळवळ कमकुवत होत चालल्याचे स्पष्ट दिसते. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत 700 हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून, भूपतीसारखा केंद्रीय नेत्याने शरणागती पत्करल्याने नक्षल चळवळ कमकुवत झाली आहे. दंडकारण्याच्या जंगलात वर्षानुवर्षे टिकून असलेल्या नक्षल चळवळीचा आता शेवटचा टप्पा जवळ आल्याचे भूपतीच्या या निर्णयाने स्पष्ट संकेत दिले आहेत. नक्षलवादी चळवळीच्या ‘जनयुद्धा’चा हा शेवट ठरेल, अशी चर्चा सुरक्षा वर्तुळात सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button