एसटी कर्मचार्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर
कर्मचार्यांचा संप मागे

मुंबई /13 ऑक्टोबर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विभागांतील कर्मचार्यांना बोनस जाहीर केला होता, मात्र सुरुवातीला एसटी कर्मचार्यांना या यादीत स्थान नव्हते. त्यामुळे नाराज एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचा इशारा दिला होता. अखेर सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे संप टळला असून कर्मचार्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एसटी कर्मचार्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी 6000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, 12,500 रुपयांची उचल घेण्याची सुविधा कर्मचार्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक महिन्याला 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा उपक्रम पुढील 48 आठवड्यांपर्यंत सुरू राहणार आहे. एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे आणि वेळेवर पगार मिळण्यात वारंवार अडथळे येत आहेत. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचार्यांना राज्य सरकारी कर्मचार्यांमध्ये सामावून घेण्याची मागणी होत आहे, मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अशा पार्श्वभूमीवर सरकारने दिवाळीपूर्वीच ही आर्थिक मदत आणि बोनस जाहीर करून कामगारांच्या रोषाला आळा घातला आहे. त्यामुळे संभाव्य संप टळला असून, एसटी कर्मचार्यांसाठी यंदाची दिवाळी अधिक गोड ठरणार आहे.




