दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक; दोन युवक ठार

दोघींचे कुंकू पुसले, चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

बुलढाणा/13 ऑक्टोबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात लाखनवाडा–आंबेटाकळी मार्गावर रविवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना लाखनवाडा गावाजवळ घडली असून मृत दोन्ही युवक हे एकाच गावातील रहिवासी होते. त्यांच्या अकाली निधनामुळे दोन महिलांचे कुंकू पुसले असून दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे लाखनवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातग्रस्त कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृतांमध्ये योगेश ज्ञानेश्वर जावळे (वय 30 वर्षे) आणि गणेश श्रीराम पांढरे (वय 39 वर्षे) या दोघांचा समावेश आहे. योगेश जावळे हा आपल्या सासरवाडी महान पिंजर (जिल्हा अकोला) येथून रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या मूळ गावी, लाखनवाडा, दुचाकीने येत होता. तर गणेश पांढरे हा कामानिमित्ताने लाखनवाडा येथून आंबेटाकळी (तालुका खामगाव) कडे दुचाकीने जात होता. या दरम्यान दोघांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात समोरासमोर धडक झाली.

धडक एवढी भीषण होती की दोघेही युवक जागीच ठार झाले. मृत दोघेही विवाहित असून योगेश जावळे याला एक वर्षाची लहान मुलगी आहे, तर गणेश पांढरे याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोघांच्या अकाली निधनामुळे लाखनवाडा गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button