खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते स्व.बंडूपंत उमरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

वरुड । 12 ऑक्टोबर -राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिवंगत बंडूपंत उमरकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त रविवारी थडीपवनी येथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने थडीपवनी गाव राष्ट्रसंतांच्या विचारांनी आणि समाजप्रबोधनाच्या भावनेने दुमदुमून गेले. कार्यक्रमात कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने स्व. बंडूपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना समाजजागृतीसाठी सातत्याने केलेल्या कार्याबद्दल हा पहिला सन्मान देण्यात आला. या पुरस्कारात १ लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश होता.या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी बंडूपंत उमरकर यांच्या जाण्याने या भागात निर्माण झालेली पोकळी मोठी असल्याचे सांगितले. त्यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिले असून, त्यांचा कार्याचा वारसा मयूर उमरकर यांनी पुढे चालवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार अमर काळे यांनीही उमरकर परिवाराच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करताना मयूर उमरकर निश्चितच आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेतील, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार डॉ. गिरीश गांधी, माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, प्रकाश गजभिये, भाऊसाहेब भोगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित अनेक प्रबोधनकारांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. समाजप्रबोधनासाठी कार्यरत सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, रामपाल महाराज, तुषार सूर्यवंशी, पवनपाल महाराज आदींच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे वातावरण भक्तीमय झाले. दिवंगत बंडूपंत उमरकर यांनी आयुष्यभर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून समाजकारण व राजकारणाचा संगम साधला, याची आठवण सर्वच मान्यवरांनी भावपूर्ण शब्दांत केली.




