मांजरखेड कसबा येथे आज बांबू परिषद
अध्यक्ष पाशा पटेलसह मान्यवरांची राहणार उपस्थिती

* बांबू लागवडीसाठी मिळणार हेक्टरी सात लाखाचे अनुदान
चांदुर रेल्वे / 12 ऑक्टोबर – शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व पर्यावरण संतुलनासाठी मांजरखेड कसबा येथे सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता बांबू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नाने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांचे शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. बांबू लागवडीसाठी शासकीय अनुदान हेक्टरी सात लाख रुपये देण्यात येते. तसेच कापूस, सोयाबीन, तूर या पिकांपेक्षा अधिक उत्पन्न देण्याची क्षमता असलेल्या बांबू लागवडीपासून ते कटाईपर्यंतचे सहाय्य तीन वर्षांनंतर दरवर्षी हेक्टरी किमान वीस टन उत्पादनाच्या स्वरूपात मिळते. विविध मार्गदर्शन मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे कॅबिनेट दर्जाचे अध्यक्ष पाशा पटेल करणार आहेत. या वेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी खासदार रामदास तडस, बांबू तज्ञ संजीव चरपे, भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख आणि भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इतर पिकांना पर्यायी उत्पन्न देण्याची क्षमता असलेल्या बांबू लागवडीच्या मार्गदर्शनासाठी मतदारसंघातील शेतकऱ्यांनी बांबू परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी केले आहे.




