अमरावती विभागात 275 अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई

मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन, ‘आरटीओ’कार्यालयाची धडक मोहीम

अमरावती /10 ऑक्टोबर : अमरावती विभागात महामार्ग, राज्य मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या स्टेज कॅरेज बसेस तसेच अवैध प्रवासी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर दंडात्मक शुल्क आकारून वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम सुरू आहे. अमरावती ते मोर्शी, वरुड ते पांढुर्णा, मुलताई रस्त्यावरील तसेच परतवाडा ते अंजनगाव, आकोट मार्गे अकोला आणि परतवाडा ते धारणी या प्रमुख मार्गांवर धावणार्‍या बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये विनापरवाना वाहतूक करणाऱ्या, कॉन्ट्रॅक्ट कॅरेज परवान्याच्या शर्तींचा भंग करणाऱ्या, जादा भाडे आकारणार्‍या तसेच वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात आली. आरटीओ विभागाने 16 डिसेंबर 2024 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबवली. 16 डिसेंबर 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत 429 वाहने तपासली गेली असून त्यापैकी 143 दोषी ठरली आणि एकूण 7,70,750 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर 1 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या तीन महिन्यांत 396 वाहने तपासून 132 दोषी वाहनांवर 7,27,250 रुपये इतके दंडात्मक शुल्क आकारण्यात आले. अंदाजे नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण 825 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 275 वाहने दोषी आढळली आणि या कारवाईतून एकूण 14,98,000 रुपये तडजोड शुल्क वसूल झाले. अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून दोषी बस मालक व चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला आहे. तसेच सणासुदीच्या काळात रस्ते वाहतूक सुरक्षा आणि जादा भाडेवाढ या अनुषंगाने तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सण कालावधीत मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमधून अमरावतीत येणाऱ्या विद्यार्थी व नोकरदार लोकांची संख्या मोठी असते, अशावेळी प्रवाशांची निकड लक्षात घेऊन प्रचंड भाडेवाढ केली जाते. दिवाळी सणाच्या वेळी हा अनुभव दरवर्षी येतो, आणि आरटीओच्या या कारवाईमुळे प्रवाशांची लूट करणार्‍यांवर जरब बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button