नागपूर कारागृहात पकडला 40 ग्रॅम गांजा
पॉस्कोचा बंदीवान रायगड जिल्ह्यातला

नागपूर /8 ऑक्टोबर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला बंदिवान यशवंत बाळू शिंदे (वय 38) याच्याकडे दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पुड्यामध्ये सेलोटेपने गुंडाळलेल्या अवस्थेत दोन पाकिटांमध्ये 40 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ पोलिसांनी जप्त केला. नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ धंतोली पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या डाव्या हातातल्या रुमालात प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवलेल्या दोन पुड्या सापडल्या. पंचासमक्ष पोलिसांनी त्याची तपासणी केली असता तो गांजा असल्याचे स्पष्ट झाले.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातल्या खांबेेशरी वाडी येथील रहिवासी यशवंत बाळू शिंदे हा अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत आहे. वैद्यकीय कारणास्तव त्याला सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर त्याच्या डाव्या हातातील रुमालात प्लास्टिकच्या दोन पुड्या आढळल्या, ज्याची माहिती लगेच धंतोली पोलिसांना देण्यात आली. पोलीस शिपाई सचिन कुंडलिकराव इंगळकर यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.




