जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

14 ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

अमरावती/8 ऑक्टोबर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीचा वापर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी करावा, अशी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार मतदार यादी विभागणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी आज, 8 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आली असून, त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. अंतिम आणि अधिप्रमाणित मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2025 असून, त्याच दिवशी मतदान केंद्र आणि मतदान केंद्रानिहाय यादीही प्रसिध्द केली जाईल.

प्रारुप मतदार यादीची हार्ड कॉपी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांवर तसेच पीडीएफ स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार किंवा नागरिकांना प्रारुप मतदार यादीत लेखकांच्या चुका, दुसऱ्या गटात चुकीने समाविष्ट झालेले मतदार, विधानसभा यादीत असताना संबंधित गण किंवा विभागात नाव राहून गेलेले मतदार, तसेच दुबार मतदार म्हणून नोंद झाल्यास हरकती किंवा सूचना पुराव्यासह 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत तहसिलदारांकडे दाखल करता येईल.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही मतदाराचे नाव मतदार यादीत नसल्याची तक्रार येऊ नये, यासाठी सर्व मतदार व राजकीय पक्षांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button