कुलूपबंद करुन ठेवलेल्या व़िठ्ठल रुख्मिणीच्या मूर्त्या खुल्या करा
फत्तेपूरच्या श्री गुरुदेव महिला पुरुष सेवा मंडळाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन

वरुड । 30 सप्टेंबर – राजकीय हेतूने विठ्ठल-रुख्मिणी मुर्तीची अवहेलना करण्यात आली असून कुलूप बंद करून ठेवलेल्या मुर्त्या सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करणारे निवेदन फत्तेपुर येथील श्री गुरुदेव महिला-पुरुष सेवा मंडळाच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फत्तेपुर येथील अजाबराव वडे यांनी दान दिलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा गुरुदेव सेवा मंडळाच्या मालकीच्या जागेत आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर करण्यात आली होती. मात्र, 7 ऑगस्ट 2025 रोजी मोरचुंद-फत्तेपुर गट ग्रामपंचायतीने सत्तेचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे दाखवून शासनाची दिशाभूल केली व महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुख्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा झालेली मुर्ती हटवून विटंबना करण्यात आली.
या घटनेचा श्री गुरुदेव मंडळ आणि वारकरी मंडळ फत्तेपुर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शिवाजी राऊत, रा. फत्तेपुर यांनी गावालगतच्या शेतातील 15,430 चौ.फु. जागा वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मुर्तीची स्थापना व्हावी आणि सामुदायिक प्रार्थना व्हावी, या उद्देशाने श्री गुरुदेव सेवा आश्रम फत्तेपुर या नावाने 3 सप्टेंबर 2008 रोजी दान दिली होती. या जागेची नोंद गट ग्रामपंचायत मोरचुंद येथे करण्यात आली होती. सन 2012 मध्ये ती जागा आश्रमाच्या नावावर देण्यात आली आणि त्यानंतर तत्कालीन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी अमदार निधीतून खुल्या सभागृहाची कबुल दिली. सन 2013 ते 2016 या कालावधीत सभागृहाची वास्तु निर्माण झाली. त्यानंतर वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मुर्ती संपुर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने बसविण्यात आली. गावकऱ्यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून वॉल कंपाऊंड व गेटचे कामही करण्यात आले.
सन 2012 ते 2020 पर्यंत मोरचुंद ग्रामपंचायतीने या जागेला श्री गुरुदेव सेवा आश्रमाच्या मालकीची मान्यता दिली होती. मात्र, 2020 ते 2021 दरम्यान राजकीय हेतूपुरस्सर 8 अ दुरुस्ती करून जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करण्यात आली आणि शासनाकडे खोटी कागदपत्रे दाखवून फसवणूक करण्यात आली. या दरम्यान, आमदार निधीतील सभागृहासाठी फत्तेपुर हनुमान मंदिर परिसरातील शिवाजी राऊत यांनी दान दिलेल्या जागेवर बांधकाम व्हावे, असे ना हरकत प्रमाणपत्रही ग्रामपंचायतीने दिले होते. याबाबत वारंवार गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून चूक दुरुस्त करण्याचे आवाहन केले, परंतु सरपंच, सचिव व सदस्यांनी ती चूक दुरुस्त केली नाही.
वारस श्री गुरुदेव महिला भवानी मंडळाने आमदार उमेश (चंदु) यावलकर यांच्याकडे परवानगीसाठी मागणी केली होती. त्यांनी तारीख दिली होती, मात्र शासकीय कामामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, आषाढी एकादशीच्या दिवशी गावकऱ्यांनी विठ्ठल-रुख्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा केली. त्यावेळी मोरचुंद सरपंच भावना शेळके यांनी चुकीचा अहवाल शासनाला देऊन दिशाभूल केली आणि राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा हिंदू बांधव आणि महाराष्ट्र वारकरी संप्रदायातर्फे निषेध करण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रशासनाने मध्यस्थी साधली असता, त्या ठिकाणी तात्पुरते कुलूप लावण्यात आले. हे कुलूप काढून दर्शनासाठी मुर्त्या सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी श्री गुरुदेव सेवा मंडळ फत्तेपुरच्या अध्यक्षा कमला सोलव, उपाध्यक्षा अंजली चव्हाण, सचिव माधुरी वडे, आशा चव्हाण, सुशिल डंबाळे, अनिता चव्हाण, अरुणा चव्हाण, गीता सोलव, निलिमा चव्हाण, दिपा नवले, वैशाली चव्हाण, शालिनी राऊत, रुमण चव्हाण, शेवंता धुर्वे, विमल चव्हाण, रंजना चव्हाण, भारती चव्हाण, रेखा जोगी, मनिषा कडू, मंगला चव्हाण, काजल चव्हाण, मिना चव्हाण, लक्ष्मी चव्हाण, शोभा चव्हाण, दिपाली चव्हाण, ललिता चव्हाण, जिजा वडे, शिला गडवे, सुवर्णा चव्हाण, तेजस्विणी सोलव, प्रज्ञा गाडगे, गंगाधर चव्हाण, मंगेश चव्हाण, सचिन चव्हाण आदींनी केली आहे.




