मुलींच्या वसतीगृहाजवळ बिबट्या दिसला; पीडीएमसी परिसरात दहशत
सहाय्यक वनरक्षक ज्ञानेेशर देसाई यांची माहिती

अमरावती / 29 सप्टेंबर – शहरातील कांता नगर व पंचवटी मोर्शी मार्गावर बिबट्याचे अनेक दर्शन झाल्यानंतर आज सायंकाळी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी) परिसरातील मुलींच्या वसतीगृहाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याच्या बातम्यांनी परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. पीडीएमसीच्या मागील बाजूस असलेल्या खुल्या मैदानाजवळ आणि वसतिगृहा जवळ बिबट्याचे दर्शन चौकीदार ज्ञानेेशर याला झाले असून त्यांनी ही माहिती तत्काळ आपल्या वरिष्ठांना दिली. सहाय्यक वनरक्षक ज्ञानेेशर देसाई यांना या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची तात्काळ टीम घटनास्थळी पाठवण्यात आली. पथकाने परिसराची पाहणी केली, मात्र बिबट्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. तरीही रात्री उशिरापर्यंत या परिसरात बिबट्याचा शोध सुरू ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कांता नगर व पंचवटी मार्गावर बिबट्याचे दर्शन वारंवार झाल्यामुळे नागरिकांमध्ये आधीच दहशत आहे आणि आता मुलींच्या वसतीगृहाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने ही भीती अधिक वाढली आहे. स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने परिसरात सुरक्षा वाढवली असून विद्यार्थिनी व कर्मचार्यांना सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. वनविभागाकडून सल्ला देण्यात आला आहे की नागरिक आणि विद्यार्थिनी परिसरात हालचाल करताना सतर्क राहाव्यात, उशिरा बाहेर निघाल्यास एकत्र हालचाल करावी आणि कोणतीही धोकादायक परिस्थिती दिसल्यास त्वरित वनविभाग किंवा महाविद्यालय प्रशासनाला कळवावे. या घटनेमुळे पीडीएमसी परिसरात पुन्हा एकदा सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाकडून बिबट्याच्या शोधासाठी तज्ज्ञांची टीम सतत तैनात ठेवण्यात आली आहे.




