चक्क पोलीस ठाण्यावरच बुलडोझर चालला

यवतमाळ /25 सप्टेंबर : बांधकाम अनधिकृत असल्याच्या कारणावरून येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीवर बुलडोझर चालविण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस ठाण्यातील बांधकाम बुलडोझर लावून पाडण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी गोधणी मार्गावरील अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते, मात्र या बांधकामासाठी समाजविघातक लोकांकडून वर्गणी गोळा करण्यात आली होती. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते दिगांबर पचगाडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयाने ही अवैध बांधकाम झालेली पोलीस ठाण्याची इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने 25 जून रोजी आदेश दिला होता, तर इमारत पाडण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली होती. त्यामुळे अवधूतवाडी पोलीस ठाण्याची इमारत मंगळवारी बुलडोझर लावून पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. ही इमारत पूर्णपणे पाडून त्याबाबतचा कार्यपूर्ती अहवाल पोलिसांना उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. एखाद्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम अवैध असणे आणि ते न्यायालयाच्या आदेशाने पाडावे लागणे ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना ठरल्यामुळे यवतमाळ शहरात या कारवाईची मोठी चर्चा सुरू आहे.




