नवनीत राणांचा भन्नाट गरबा डान्स
‘परंपरा ग्रुप’च्या ‘अंबा महाकुंभ’ भव्य रासगरबा महोत्सवाचे उदघाटन

* महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनीही दिली साथ
* पहिल्याच दिवशी गरबा रसिकांची अलोट गर्दी
अमरावती / 23 सप्टेंबर : सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवरात्रोत्सवात सर्वांचे मोठे आकर्षण असते, ते म्हणजे तरुणाईचे गरबा नृत्य आणि दांडिया. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीही या उत्सवात सहभागी होत असतात. अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी गरबा नृत्य सादर केले असून त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे अमरावतीच्या महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनीही नवनीत राणा यांच्यासोबत गरबा नृत्य करून रसिकांचा उत्साह द्विगुणित केला.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पर्वावर अमरावतीतील गरबाप्रेमींसाठी खास आकर्षण ठरलेल्या ‘परंपरा ग्रुप’च्या ‘अंबा महाकुंभ’ भव्य रासगरबा महोत्सवाचा शंकर नगर येथील भामकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ झाला. माजी खासदार नवनीत राणा, अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा आणि राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा मैदानावर गरबा रसिकांचा अलोट उत्साह दिसून आला.
प्रमुख पाहुण्या नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून अंबा मातेची महाआरती केली. यानंतर रासगरब्याचे सूर छेडले जाताच स्वतः नवनीत राणा आणि आयुक्त सौम्या शर्मा यांनी गरबा नृत्य करून रसिकांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी ‘परंपरा ग्रुप’ तसेच नंदा प्रॉपर्टीचे ऋषभ मनोज भारानी, विकी खत्री, गुरुकृपा डेव्हलपरचे मनोज बख्तार, गोविंदा ग्रुपचे विजय तलडा, पंजाबी ढाब्याचे सरबजीत सलुजा, अडवानी ज्वेलर्सचे पियुष अडवानी, राजू अडगुलवार, आराधनाचे प्रतीक हबलानी आदींनी या भव्य आयोजनाचे कौतुक केले.
या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आयोजक सुनील राणा, नितीन अनासने, मनोज चांदवानी, राहुल बजाज, किशोर पिवाल, दिनेश सेठिया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका यांच्यासह अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. ‘अंबा महाकुंभ’च्या माध्यमातून गरबाप्रेमींना नऊ दिवस रासगरब्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.




