यावर्षी संघाचा विजयादशमी उत्सव जोरात

प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

* देश विदेशातील स्वयसेवक होणार सहभागी

नागपूर /22 सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव यंदा अधिक उत्साहात साजरा होणार असून, नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन आणि मुख्य संबोधन होणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. या प्रसंगी देशभरातील वरिष्ठ स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, घाना, दक्षिण आफ्रिका, थायलंड, इंग्लंड आणि अमेरिका येथील काही नागरिक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू समाजात जागरूकता आणि सशक्तीकरण यावर भर दिला जाणार आहे. विजयादशमी दिनाच्या पोर्शभूमीवर संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे पथसंचलन 28 सप्टेंबर रोजी दोन मार्गांवरून होणार आहे. पहिले पथसंचलन यशवंत स्टेडियम ते व्हरायटी चौक, तर दुसरे अमरावती रोडवरील हॉकी मैदान ते व्हरायटी चौक या मार्गांवरून होणार आहे. या पथसंचलनात शेकडो स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात सहभागी होणार आहेत. याशिवाय बाल स्वयंसेवकांचे स्वतंत्र पथसंचलनही आयोजित करण्यात येणार आहे. देशभरात सध्या संघाच्या सुमारे 83 हजार शाखा नियमितपणे कार्यरत आहेत. याखेरीज आठवड्यातून एकदा होणार्‍या 32 हजार बैठकांद्वारे संघाची वैचारिक आणि सामाजिक चळवळ अधिक बळकट होत असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी विजयादशमी उत्सवाच्या पोर्शभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या भूमिका स्पष्ट केल्या.

संबंधित बातम्या

Back to top button