मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची अंबादेवी मंदिराला भेट
भव्य आरोग्य शिबिराचे केले उद्घाटन

* भाविकांनी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचा घ्यावा लाभ
* मंदिर परिसरात स्वच्छता व शिस्त राखण्याचे आयुक्तांचे निर्देश
* आयुक्तांच्या देवीचे पूजन
अमरावती /22 सटेंबर : नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने आज, दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी, अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी श्री अंबादेवी व श्री एकविरादेवी मंदिर परिसराला भेट दिली. आयुक्तांचे मंदिरात आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी आयुक्तांनी देवीचे पूजन-अर्चन करून दर्शन घेतले. यानंतर श्री अंबादेवी नवरात्री उत्सवात खुले प्लॉट इच्छुक व्यवसायीधारकांना व्यवसायासाठी वितरीत करण्यात आलेल्या जागांची आयुक्तांनी स्वतः पाहणी केली आणि बाजार व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार यांच्याशी सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली. तसेच श्री अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसराची स्वच्छता, व्यवस्था व सुविधा यांची पाहणीही आयुक्तांनी केली. दरम्यान, दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत श्री अंबादेवी यात्रास्थळी भाविकांच्या आरोग्य सोयीकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका अमरावती यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, या शिबिराचे उद्घाटन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या प्रसंगी आयुक्तांनी स्वतः रक्त तपासणी करून भाविकांना दिल्या जाणार्या सेवांचा अनुभव घेतला, तसेच यात्रेत आयोजित रक्तदान शिबिराची पाहणी करून वैद्यकीय अधिकार्यांशी संवाद साधत शिबिराच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेतली. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नवरात्री उत्सवात सहभागी होणार्या भाविकांना आरोग्य तपासणी व रक्तदानाची संधी मिळून त्यांचा आरोग्यदायी व सुखकर यात्रानुभव होण्यास मोठी मदत होणार आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, श्री अंबादेवी व एकविरादेवी यात्रेदरम्यान भाविकांची सोय, स्वच्छता व आरोग्य यास प्राधान्य देण्यात यावे, खुले प्लॉट वाटप केलेल्या व्यवसायिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने व नियमांचे पालन करूनच व्यापार करावा, मंदिर परिसर स्वच्छ, सुरक्षित व वाहतुकीस अडथळा न आणणारा राहावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे. आरोग्य शिबिरात अधिकाधिक भाविकांनी सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. श्री अंबादेवी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात, या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, नागरिकांनी व भाविकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच स्वच्छता, शिस्त व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून नवरात्री उत्सव यशस्वी करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले. या पाहणी दरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, बाजार व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार, उदय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कोवे, डॉ. संदीप पाटबागे, डॉ. रुतुजा सुरजे, डॉ. माधवी वानखडे, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, भाजीबाजार येथील पीएचएम चे उमा शिंदे व त्यांच्या सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, आरोग्य स्वयंसेविका, जिल्हा रुग्णालय मार्फत रक्त संकलन करणारी चमू तसेच दंत महाविद्यालयातील अमरावती तर्फे दंत तपासणी करण्याकरीता दंत वैद्यकीय तज्ञांची चमू उपस्थित होती.




