गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न
जालन्यात तणावाचे वातावरण

जालना/21 सप्टेंबर – राज्यात सध्या एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापलेले असताना, आज जालना जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सदावर्ते हे जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी आले असताना हा प्रकार घडला. सदावर्ते हे आज आंदोलनात सहभागी असलेल्या दीपक बोर्हाडे यांची भेट घेण्यासाठी जालन्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनावर काही व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यामागे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदावर्ते यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. असा हल्ला करून मला काहीही थांबवू शकत नाही, असे ते म्हणाले. मी आज डंके की चाटे पर बालेणार आहे. धनगर बंधू व एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी लढत आहे. त्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो. सदावर्ते पुढे म्हणाले की, मी स्टंट बाजी किंवा नाटक करण्यासाठी जालना येथे आलेलो नाही.




