100 बोकडांचं मटण आणि 3-3 कोटींचा खर्च

संजय गायकवाडांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बुलढाणा /21 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. मी आमदार नसतानाही 20 कोटी मिळत असल्याचा दावा माजी आमदार सदा सरवणकर यांनी केल्यानंतर राज्यात वादाला तोंड फुटले आहे. अशातच आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुकींसाठी 3-3 कोटींचा खर्च येत असल्याचे मोठे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आमदार निवास कॅन्टीनमधील कर्मचार्‍याला बॉक्सिंग पंच मारला होता. आता तर त्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात खर्चाच्या वादाला ठिणगी लावण्यासारखे वक्तव्य केले आहे. राज्यात काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी 3-3 कोटींचा खर्च करावा लागतो, असा दावा आमदार गायकवाड यांनी केला आहे. एवढंच नाही तर 100-100 बोकड कापावे लागतात, असेही ते म्हणाले आहेत. थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोप्या राहिल्या नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुकांसाठी 2-3 कोटींचा खर्च आणि 100-100 बोकडं कापावी लागत असल्याने इतक्या खर्चिक निवडणुकीमुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो, असे गायकवाड म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button