आत्महत्या नको, संघर्ष करा! आंदोलनासाठी ट्रॅक्टरच हत्यार

राकेश टिकैत यांचे शेतकर्‍यांना आवाहन

-आंदोलन दडपण्यासाठी जात-धर्माचा वापर
-जमीन हडपण्याचा डाव-सरकारवर टिकास्त्र
-जिल्हा बँकेच्या संवाद कार्यक्रमात सहभाग
अमरावती / 18 सप्टेंबर : विदर्भात सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांनी आत्महत्या टाळून थेट प्रशासनाच्या दारात धडक द्यावी, असे आवाहन गुरुवारी अमरावतीत केले. शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका, घर-दार घेऊन तहसील कार्यालय, एसडीओ किंवा कलेक्टर कार्यालयात जा. मोर्चा तुमच्या पाठीशी असून अन्यायाविरुद्ध संघर्ष करील. जेसीबीला उत्तर देण्यासाठी आमचे ट्रॅक्टर सज्ज आहेत, असे टिकैत म्हणाले.
अमरावती जिल्हा सहकारी बँक सभागृहात झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या वेळी किसान सभेचे डॉ. अशोक ढवले, राजन क्षीरसागर, कृषी विशारद पी. साईनाथ, वीजू कृष्णन, युध्दवीर सिंह, ताजिंदर सिंह वीर्क, रामिंदर सिंह पटियाला यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दिल्ली सीमेवर 13 महिने लढा देत मोर्चाने केंद्र सरकारला झुकवले. यातून ट्रॅक्टर असलेला तरुण शेतकरी जागा झाला. आता ट्रॅक्टर हा शेतकर्‍यांचा युद्धहत्यार आणि शेतीचे साधन अशा दोन्ही रूपांत काम करतो. आत्महत्या न करता ग्रामीण भागातील युवक धैर्याने लढा द्यावेत, आमचा पाठींबा राहील, असे टिकैत म्हणाले.
टिकैत यांच्या मते, मागील 25 वर्षांत देशभरात दरवर्षी किमान 1 लाख शेतकरी आत्महत्या करतात. परंतु सरकार हे आकडे लपवते. 2023-24 च्या आकडेवारीची माहिती सार्वजनिक केलीच नाही, असे डॉ. अशोक ढवले यांनी येथे उपस्थित पत्रकारांना सांगितले. त्यांनी कपास आयात शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी केली. 50 टक्के शुल्क लावा, सीसीआयने कपाशीला प्रती क्विंटल 8150 रुपये दराने एमएसपीवर खरेदी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन फोडण्यासाठी जात-धर्माचा आधार घेते. 2021 नंतर आमच्याशी थेट चर्चा झालेली नाही. काँग्रेस असो वा भाजप, मोर्चा फक्त शेतकर्‍यांचे हित पाहतो, असे टिकैत म्हणाले. कर्नाटकमध्ये विमानतळासाठी जमिनीचे अधिग्रहण रोखण्यात आले, असे उदाहरण देतानाच महाराष्ट्र सरकारला इशारा दिला की शेतकर्‍यांची जमीन नीलाम करण्याचा प्रयत्न झाल्यास मोर्चाचे कार्यकर्ते दिल्लीहून धावून येतील आणि नीलामी रोखतील. मात्र महाराष्ट्रात अजून अशी नीलामी न घडल्याचे ते कबूल करताना थोडे निरुत्तर झाले.
यावेळी अमरावतीचे संयोजक अशोक सोनारकर, गुरमीतसिंह मेहमा, राजेंद्र भावके, अनिल त्यागी, अ‍ॅड. शिवसिंग, उद्धव शिंदे, किशोर धमाले, गोपीनाथ कांबळे, सुशीला मोराळे, मामी दला बिकसापती, मंदाला वेंकना, दासू बाळासाहेब, सुखविंदर सिंह औलक, सतीश आजाद, शशिकांत, प्रत्युष श्रीवास्तव, माधुरी खडसे, विलास भोंगाडे, डॉ. अजीत नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.
-हिंदुत्वाचे प्रमाणपत्र नागपूरमधून?
पत्रकारांशी बोलताना टिकैत यांनी उपरोधिक फटकारा देत सांगितले, हिंदुत्वाचे प्रमाणपत्र आता नागपूरमधून मिळते. मला जर हिंदू असल्याचे सिद्ध करावे लागणार असेल तर कधी तरी नागपूरातून प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर संघटनात्मक राजकारणाचे आरोप केले.
-आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धीर
तीन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यात टिकैत यांनी आत्महत्या केलेल्या दोन शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वर्धा, मोझरी, तिवसा या ठिकाणी सभांनंतर ते अमरावतीत आले. त्यांनी आरोप केला की बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली सरकार जमीन हडपण्याचा डाव रचत आहे. प्रकल्प, महामार्ग, औद्योगिकीकरण या नावाखाली शेतजमिनी बळकावल्या जात आहेत. समर्थनभाव वाढवला जात नाही, शेतकर्‍यांनी आर्थिकदृष्ट्या त्रस्त होऊन जमीन विकावी आणि मजूर व्हावे, यासाठी हे सगळे षडयंत्र आहे. पण आम्ही असे होऊ देणार नाही, असा इशारा टिकैत यांनी दिला.

संबंधित बातम्या

Back to top button