डॉक्टरांचा बंद, जिल्ह्यातील दवाखाने राहीले बंद
होमिओपॅथला एलोपॅथी परवानगीचा विरोध

-आयएमएचे एकदिवसीय आंदोलन यशस्वी
-परिपत्रक रद्द करण्याची मागणी
-आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
अमरावती / 18 सप्टेंबर : राज्यातील होमिओपॅथ डॉक्टर्सना केवळ सहा महिन्यांचे सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एलोपॅथी पद्धतीने काम करण्याचा मार्ग मोकळा करणार्या शासनाच्या परिपत्रकाचा इंडियन मेडिकल असोसिएशनने कडाडून विरोध करत आज, 18 सप्टेंबर रोजी एकदिवसीय सांकेतिक बंद पूकारला होता. आयएमएच्या म्हणण्यानुसार, हे आंदोलन पूर्णतः यशस्वी ठरले.
या आंदोलना दरम्यान आपत्कालीन सेवा सुरू ठेवून अन्य खासगी रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्यात आले. हे आंदोलन 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होऊन 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तास चालणार असल्याचे आयएमए अमरावती विंगने स्पष्ट केले. अमरावती आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अलका कुथे, सचिव डॉ. राधा सावदेकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी कॅम्प रोडवरील आयएमए भवनात निषेध सभेला संबोधित केले. राज्य आयएमएकडून पुढील आंदोलनाच्या सूचना मिळताच संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी सभेत दिला. यावेळी जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर्स मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा आयएमएने दावा केला.
आईएमएने स्पष्ट केले की राज्य सरकारचा हा निर्णय थेट रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा आहे. केवळ सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले होमिओपॅथ डॉक्टर्स जर एलोपॅथी पद्धतीने उपचार करतील, तर अपूर्ण प्रशिक्षित हातात रुग्णाचे जीवित जाईल, असे डॉक्टरांनी नमूद केले. एनएमसी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कायद्यांचे उल्लंघन होईल, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता कमी होईल, असा इशाराही देण्यात आला.
11 जुलै रोजी निर्गमित केलेले परिपत्रक तत्काळ मागे घ्यावे, त्यावर अंमलबजावणी हायकोर्टाचा आदेश येईपर्यंत थांबवावी, तसेच आधुनिक वैद्यकशास्त्राची पवित्रता अबाधित ठेवावी, अशा मागण्या आयएमएने राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत. निर्णय परत न झाला, तर मुंबईतील आजाद मैदानातून मोर्चा काढण्यात येईल तसेच बेमुदत उपोषणासारख्या तीव्र मार्गांचा अवलंब केला जाईल, असा इशाराही आयएमएकडून देण्यात आला आहे.
या निषेध आंदोलनात डॉ. संदीप दानखडे, डॉ. आनंद काकाणी, डॉ. सिकंदर आडवाणी, डॉ. मुरली बूब, डॉ. श्रीगोपाल राठी, डॉ. अजय डफले, डॉ. पंकज घुंडियाल, डॉ. तापडिया, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. भूपेश भोंड, डॉ. नितीन दातीर, डॉ. अनिल बजाज, डॉ. धीरज सवाई, डॉ. जयप्रकाश बनकर, डॉ. तृप्ती दानखडे, डॉ. श्रेया गांधी, डॉ. निलिमा ठाकरे, डॉ. जावरकर, डॉ. लक्ष्मी भोंड, डॉ. आशीष डगवार, डॉ. रोहन बोबडे, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. सीमा हरवाणी, डॉ. पुष्पा थोरात, डॉ. दिनेश वाघाडे, डॉ. धीरज बारब्दे, डॉ. स्वप्नील रुद्रकार, डॉ. नीलेश पाचकवडे, डॉ. आशीष साबू, डॉ. सावजी, डॉ. कावलकर, डॉ. रितेश आडवाणी, डॉ. आरती मुरके, डॉ. संगीता गावंडे, डॉ. मोनिषा पाटील, डॉ. मुकुंद गुजरकर, डॉ. अनिल रोहनकर, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. उमक, डॉ. पानट, डॉ. भोयर, डॉ. जवादे, डॉ. हंतोडकर, डॉ. माधुरी अग्रवाल, डॉ. मोना आडतिया, डॉ. शीतल पोटोडे, डॉ. अश्विनी देशमुख, डॉ. खांदेवाले, डॉ. नवीन सोनी, डॉ. नवीन चौधरी, डॉ. नितीन गावंडे, डॉ. नितीन सोनोने, डॉ. देशमुख आणि इतर अनेक डॉक्टर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले.




