जीएसटी तक्रारी सोडवणार, त्रैमासिक भेटींचे आश्वासन

सीजीएसटी सहायक आयुक्त अग्रवाल अमरावतीत

-व्यापारी-उद्योगपतींसोबत चर्चा
-कर सल्लागार संघटनेतर्फे चर्चासत्र
-नोंदणी, अस्सेसमेंट, रेक्टिफिकेशनवर मांडणी
अमरावती / 18 सप्टेंबर : अमरावतीतील व्यापार्‍यांच्या जीएसटीसंबंधी तक्रारींचे निराकरण करण्याचे आश्वासन नागपूर आयुक्तालयाचे सीजीएसटी सहायक आयुक्त सुमित अग्रवाल यांनी दिले. प्रत्येक तीन महिन्यांनी अमरावतीला भेट देऊन व्यापारी संघटनांशी संवाद साधण्याचा आपला प्रयत्न राहील, असे जाहीर करून अग्रवाल यांनी उद्योगपती व कर सल्लागारांना दिलासा दिला. दिवाळीनंतर येत्या 5 नोव्हेंबर रोजी ते अमरावतीला पुन्हा भेटणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
नवसारीस्थित जीएसटी भवनात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील उद्योगपती, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच कर सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अग्रवाल यांनी सर्वांचे निवेदन, सूचना व तक्रारी गांभीर्याने ऐकल्या आणि निराकरणासाठी सीबीआयसीपर्यंत त्यांची थेट मांडणी होईल, अशी ग्वाही दिली. यावेळी टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर खंडेलवाल, सचिव श्रेणिक बोथरा, सहसचिव भूषण लाठिया, राजेश चांडक, आर. एस. लढ्ढा, जगदीश शर्मा, संदीप अग्रवाल, अयाज खान, आदित्य खंडेलवाल, यश शर्मा, पराग लखोटिया, विनय दोशी तसेच चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी विनोद कलंत्री, श्याम शर्मा, संदीप इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्रात टीबीएच्या वतीने अग्रवाल यांचा स्नेहपूर्ण सत्कारही करण्यात आला.
बैठकीत व्यापारी समुदायाकडून जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीतील अडचणी, अस्सेसमेंट प्रक्रियेत येणार्‍या दिरंगाईसह विशेषतः रेक्टिफिकेशनमध्ये होणार्‍या विलंबामुळे व्यापारी वर्गाला होणारे नुकसान याविषयी ठळकपणे मांडणी झाली. याशिवाय अमरावतीत जीएसटी अपील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी उपस्थितांनी अग्रवाल यांच्यासमोर ठेवली. सध्या व्यापार्‍यांना जीएसटी अपीलसाठी नागपूर धाव घ्यावी लागत असल्याने येथे स्वतंत्र अपील सुविधा व्हावी, हा आग्रह व्यक्त करण्यात आला. व्यापारी समुदायाच्या सर्व मागण्या व सूचनांची नोंद घेतल्यानंतर सहायक आयुक्त अग्रवाल यांनी सर्व तक्रारींच्या निवारणासाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू राहतील आणि त्रैमासिक अमरावती भेटीद्वारे व्यापार समुदायाशी प्रत्यक्ष संवाद साधला जाईल असे स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button