दादरमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग
आरोपी उपेंद्र पावसकर अटक

-विटंबनेमुळे शिवसैनिकांमध्ये संताप
-संतप्त प्रतिक्रिया आणि ठाकरे बंधूंची धाव
मुंबई / 17 सप्टेंबर : दादरच्या शिवाजी पार्कमध्ये असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे आज राजकीय वातावरण ढवळून निघाले. सकाळी अज्ञात व्यक्तीने पुतळ्यावर लाल रंग फेकून अपमान करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासात आरोपीची ओळख पटली असून मुंबई पोलिसांनी उपेंद्र गुणाजी पावसकर यास अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राज्यातील राजकारणातही पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.
शिवाजी पार्कमधील पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छाननी सुरू केली. तपासादरम्यान आरोपी उपेंद्र पावसकरचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा कबूल केल्याचे समजते. पावसकर हा ठाकरे कुटुंबाच्या कार्यकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे. घटना उघड होताच शिवसेना कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली. संतप्त कार्यकर्त्यांनी पुतळ्याजवळ जमून पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली. तत्पूर्वी ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
उद्धव ठाकरे यांनी जोरदार शब्दात निषेध नोंदवत म्हटलं, हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे. ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, अशा लावारिस लोकांनीच असं कृत्य केलं असावं. हे कृत्य बिहारमधील मोदींच्या आईच्या अपमान प्रकरणासारखंच आहे. राज ठाकरे यांनीही पाहणी करत लगेचच पोलिसांना सूचना दिल्या आणि आरोपीला 24 तासांत अटक करण्याची मागणी केली होती. या पुतळा विटंबना प्रकरणानंतर राज्यभरात राजकीय खळबळ उडाली. विरोधी पक्षांसह इतर नेत्यांनीही आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. अखेर अटक होताच वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा तपास आता मुंबई पोलीस करत असून, आरोपीच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर तपास सुरू आहे.
-आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब
अटकेनंतर पोलिसांनी घेतलेल्या जबाबात आरोपी उपेंद्र पावसकरने धक्कादायक खुलासा केला. कौटुंबिक संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उपेंद्र पावसकर सातत्याने दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी करण्यासाठी येत असे. सध्या आरोपीच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. राजकीय हस्तक्षेप, वैयक्तिक वाद आणि संभाव्य राजकीय कट या सर्व बाजूंनी छाननी केली जात आहे. दरम्यान, शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.




