आज जिल्ह्यातील 1100 डॉक्टर संपावर

क्लिनिक व दवाखाने बंद राहणार

-होमिओपॅथना एलोपॅथी सरावाच्या अधिकारावर आक्षेप
अमरावती / 17 सप्टेंबर : महाराष्ट्र सरकारनं होमिओपॅथी पदवीधरांना सहा महिन्यांचा सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एलोपॅथी पद्धतीने उपचार करण्याचा अधिकार दिल्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) कडाडून विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आयएमएच्या अमरावती शाखेनं 18 सप्टेंबर रोजी एकदिवसीय सांकेतिक संप पुकारला असून, जिल्ह्यातील तब्बल 1100 डॉक्टर या संपात सहभागी होणार असल्याची माहिती सचिव डॉ. राधा सावदेकर यांनी दिली. संपादरम्यान दवाखाने, क्लिनिक आणि रुग्णालये बंद राहणार असून, डॉक्टर दुपारी निदर्शनेही करणार आहे.
आयएमएच्या सूत्रांनी सांगितले की, राज्याध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या घोषणेनुसार हा संप उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 24 तास सुरू राहील. या संपामुळे अमरावती जिल्ह्यातील आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार असल्याचे मानले जाते. सरकारनं 11 जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सहा महिन्यांचा सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीसह एलोपॅथीक प्रॅक्टिस करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यावर तीव्र हरकती घेत, आयएमएने 5 सप्टेंबरलाच सरकारला हे परिपत्रक तातडीने रद्द करावे, किमान हायकोर्टाच्या आदेशापर्यंत स्थगित ठेवावे, तसेच रुग्णांच्या जीवित सुरक्षेला धोका होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी केली होती.
सरकारच्या निर्णयामुळे आधुनिक वैद्यकीय शिक्षण आणि चिकित्सकतेची पातळी उतरेल, कायद्यांचे उल्लंघन होईल, आणि रुग्णांवर अपूर्ण प्रशिक्षित डॉक्टर उपचार करून थेट सुरक्षिततेशी खेळ करतील, असा दावा आयएमएनं केला आहे. ही भूमिका रुग्णांच्या जीवाशी सरळ खेळ करणारी असून वैद्यकीय व्यावसायिकतेची पवित्रता अबाधित ठेवण्यासाठी लढा अपरिहार्य आहे, असे सचिव डॉ. राधा सावदेकर यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील आजाद मैदानावरून आयएमएचे पदाधिकारी व सभासद मोर्चा काढणार आहेत. एवढ्यावरच न थांबता, जर सरकारनं आपला निर्णय मागे घेतला नाही, तर अनिश्चितकालीन उपोषणालाही सुरुवात केली जाईल, असा इशारा आयएमएनं दिला आहे. अमरावतीसह संपूर्ण राज्यातील एलोपॅथीक डॉक्टरांचा सहभाग असलेल्या या संपातून सरकारवर दडपण आणण्याची चळवळ उभारली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button