कला निकेतन शोरूमला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान
इन्व्हर्टरच्या स्फोटामुळे बिझीलँडमध्ये अग्नीतांडव

-आग विझविण्यासाठी 9 बंबांची मदत
-चार तास अग्नीशमन दलाची धावपळ
अमरावती / 16 सप्टेंबर : नागपूर रोडवरील बिझीलँड व्यापारिक संकुलातील नामांकित कला निकेतन या घाऊक कपड्यांच्या प्रतिष्ठानात आज सकाळी भीषण आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाले. सकाळी 9.40 वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने प्रतिष्ठानातील संपूर्ण रेडिमेड कपड्यांचा संचय आणि फर्निचर जळून खाक झाले. शोरुमचे संचालक विक्की राजकुमार वरदानी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख संतोष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबले, शिफ्टप्रमुख सुनील काकडे यांच्यासह फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी धावून आले. आग वाढत असल्याचे दिसताच त्वरित अतिरिक्त मदतीची मागणी करण्यात आली. एमआयडीसी, प्रशांत नगर, ट्रान्सपोर्ट नगर याठिकाणी असलेल्या फायर स्टेशनमधूनही गाड्या दाखल झाल्या. एकूण नऊ अग्निशामक गाड्या व स्मोक एक्झॉस्ट फॅन, जम्बो टेंडरच्या साहाय्याने सुमारे चार तासांची प्रचंड कसरत करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश आले.
कला निकेतनच्या आसपास अन्य अनेक कपड्यांची दुकाने असल्याने आग पसरून मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाने जोखीम पत्करून आगीला ताब्यात घेतले. धुराचे प्रचंड लोट आणि शोरुममधील ज्वाळा पाहून व्यापारी व नागरिकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र विक्की वरदानी यांना कोट्यवधींचा आर्थिक फटका बसल्याचे निश्चित झाले आहे.
आग विझविण्याच्या साहसी मोहिमेत अग्नीशमन दलाचे वाहनचालक नितिन इंगोले, सागर टक्के, विकास इंगळे, कासम खान, फायरमॅन राजेश गजबे, गौरव दंदे, हर्षद दहातोंडे, प्रतिक घाटे, गोविंद घुले, श्याम भोपळे, रोशन आलुडे यांच्यासह प्रशांत नगर केंद्राचे प्रमुख अजय पंधरे, वाहनचालक इमदाद खान, राजू शेंडे तसेच फायरमॅन सूरज लोणारे, अतुल कपले, अक्षय देशमुख व शिरभाते यांनी अथक परिश्रम घेतले.
-एक वर्षात तिसरे अग्निकांड
बिझीलँड संकुलात गेल्या एक वर्षात घडलेला हा तिसरे मोठे अग्निकांड आहे. यापूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे कपड्यांचा मोठा साठा जळून खाक झाला होता. आजच्या आगीमागे इन्व्हर्टरमध्ये झालेल्या ब्लास्टमुळे शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. महापालिका अग्निशमन विभागाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून तपास सुरू आहे.




