अचलपूरच्या बेगमपुरा भागात 2 लाखांची घरफोडी

-किमती सोन्याचे दागिने लंपास
अचलपूर / 16 सप्टेंबर : अचलपूर शहरातील बेगमपुरा भागात राहणार्‍या एका महिलेच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही घटना 8 ते 12 सप्टेंबरदरम्यान घडली असून, अचलपूर पोलिसांनी 14 सप्टेंबर रोजी या घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी निशा भरत चरपे (वय 40, रा. बेगमपुरा, अचलपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार निशा चरपे या कुटुंबियांसह धार्मिक कार्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेल्या होत्या. घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटांची उचापती करून सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे कानातले, चैन, मंगळसूत्र, गोफ, मण्यांची माळ तसेच सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. एकूण 30 ग्रॅम वजनाचे हे सोन्याचे दागिने असून त्यांची किंमत जवळपास दोन लाख पाच हजार रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी माधवराव गरुड तसेच अचलपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन म्हेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अचलपूर शहरात काही दिवसांतच घडलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, बेगमपुरासह शहरातील इतर भागांत वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलिस प्रशासनाचे आव्हान अधिकच वाढले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button