मुर्तिजापूरात रेल्वेतून उतरताना प्रवासी गाडीखाली अडकला

गॅस कटरच्या मदतीने सुटका

-स्थानकावर दीड तास थरार
-पुणे-अमरावती एक्सप्रेसमधील घटना
मुर्तिजापूर / 15 सप्टेंबर : अकोल्यातील मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनवर सोमवारी दुपारी घडलेल्या एका भीषण अपघाताने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. पुणे-अमरावती एक्स्प्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात स्थानिक प्रवासी मुस्ताक खान मोईन खान रेल्वेच्या पायरीवरून घसरला आणि थेट गाडीखाली अडकला. क्षणभरात प्लॅटफॉर्मवर प्रचंड घाबरगुंडी उडाली. प्रवासी गाडीखाली अडकून हालचाल करू शकत नसल्याने हा प्रसंग पाहणारे थेट धक्क्यातून थरकापले.
घडल्या क्षणापासून प्रवाशांच्या आणि उपस्थित रेल्वे कर्मचार्‍यांच्या श्वासात श्वास नव्हता. जखमी प्रवासी इतका घट्ट अडकला होता की त्याला बाहेर काढणे अशक्य ठरत होते. तातडीने रेल्वे पोलिसांनी जय गजानन आपत्कालीन पथकाला मदतीस बोलावले. सुटकेच्या मोहिमेत गाडीचे पायदान कापण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गॅस कटरचा वापर करून अडकलेल्या प्रवाशाला मैदानातून बाहेर खेचण्यात यश आले. जवळपास दीड तास चाललेल्या या थरारक प्रयत्नानंतर शेवटी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
सुटलेल्या प्रवाशाची प्रकृती मात्र गंभीरच असून मुस्ताक खानच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झालेली आहे. घटनेनंतर तात्काळ त्याला श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. या अपघातामुळे पुणे-अमरावती गाडी तब्बल 1 तास 20 मिनिटे मूर्तिजापूर स्थानकावर उभी राहिली. अचानक गाडी थांबल्याने इतर शेकडो प्रवाशांमध्ये गोंधळ व संभ्रम निर्माण झाला. घटनास्थळी लोकांची गर्दी झाल्याने सुटकेचे काम अधिक कठीण झाले होते.
या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गाड्यांमधून उतरताना प्रवाशांची घाई-गडबड, सुरक्षित पायर्‍यांचा अभाव आणि रेल्वे कर्मचार्‍यांच्या दक्षतेचा अभाव या मुद्द्यांकडे स्थानिक प्रवाशांनी बोट दाखवले आहे. जर आपत्कालीन पथक वेळेवर पोहोचले नसते तर मोठा जीवितहानीचा प्रसंग घडला असता, अशी चिंता प्रवाशांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेले नसले तरी या घटनेने रेल्वे सुरक्षेविषयी उपाययोजनांची तातडीची गरज अधोरेखित केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button