योगेश लोखंडे यांची प्रहार जिलाध्यक्षपदी नियुक्ती
बच्चू कडूंच्या हस्ते नियुक्तिपत्र, कार्यकर्त्यांमध्ये आनंद

अमरावती / 12 सप्टेंबर : तिवसा तालुक्यातील तरुण कार्यकर्ते योगेश लोखंडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिलाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या नियुक्तीमुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजकार्यातून सदैव अग्रस्थानी राहिलेल्या लोखंडेंच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
अमरावती सर्किट हाऊस येथे झालेल्या विशेष बैठकीदरम्यान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते योगेश लोखंडे यांना जिलाध्यक्षपदाचे नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना बच्चू कडूंनी सांगितले की, लोखंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समाजकारण, युवकांना दिलेली दिशा आणि जनतेशी जुळलेला त्यांचा स्नेहभाव पाहता हे मनोनयन करण्यात आले आहे. जिल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध राहतील आणि पक्षाला अधिक बळकट करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीची बातमी कळताच तिवसा तालुक्यासह जिल्हाभरातील प्रहार कार्यकर्त्यांत उत्साहाची लहर उसळली. अनेकांनी सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्ष भेटून लोखंडेंना अभिनंदन केले. जिल्ह्याच्या विकासासाठी अथक परिश्रम घेऊ आणि प्रहार पक्षाच्या कार्याला अधिक गती देऊ, असा निर्धार लोखंडेंनी व्यक्त केला. तरुणाईला दिशा देणारे नेतृत्व, लोकहितासाठी झटणारा उत्साही कार्यकर्ता अशी ओळख असलेले योगेश लोखंडे यांची ही निवड तिवसा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.



