ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर युतीचं सोनं लुटणार का?

शिवतीर्थ भेटीत उद्धव-राज एकत्र

-आगामी युतीची चर्चा रंगली
मुंबई / 10 सप्टेंबर : ठाकरेंचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर होणार असून, 2 ऑक्टोबरला महापालिकेने त्याला परवानगी दिली आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत की नाही, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा विशेष महत्वाचा ठरत आहे. यंदा ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत.
2005 नंतर ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकत्र आले नव्हते, मात्र काही महिन्यांपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोघांची भेट होत असल्याचे दिसले. गणेशोत्सवात उद्धव ठाकरे यांनी अनेक दशकांनंतर राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली होती. आज, 10 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या शिवतीर्थ भेटीत उद्धव-राज ठाकरे पुन्हा एकत्र आले, जिथे दोघांनी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. बैठकीत ठाकरेसेनेकडून संजय राऊत व अनिल परब आणि मनसेकडून बाळा नांदगावकर उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, या बैठकीनंतर दोन्ही पक्ष सकारात्मक भूमिकेवर आले आहेत आणि शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना नवी उधाण मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आणि शिवाजी पार्कात महायुतीच्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं कौतुक केले. आता दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेने राज्यातील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. राज ठाकरे महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर येणार आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. दुसरीकडे, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करत असल्याने, ठाकरे बंधूंची राजकीय भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
-दसरा मेळाव्याचे महत्व
दसरा मेळावा हे ठाकरे गटाचे प्रमुख राजकीय व्यासपीठ मानले जाते. शिवसेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाही 2 ऑक्टोबरला महापालिकेने परवानगी दिल्यामुळे हा मेळावा राजकीय रणसंग्रामाचे केंद्रबिंदू ठरत आहे. राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची चर्चाही युतीसाठी अपेक्षाभरी चर्चा निर्माण करत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button