नेपाळमध्ये राजकीय भूकंप: पंतप्रधान ओलींचा राजीनामा
माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू

-संसदेत शिरकाव, सत्ताधार्यांची घरे पेटविली
-केंद्रीय अर्थ मंत्र्यांवर जमावाचा हल्ला
काठमांडू / 9 सप्टेंबर : नेपाळमधील राजकीय परिस्थिती गंभीर तणावपूर्ण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशभरात विशेषतः तरुणाई रस्त्यावर उतरून नेपाळ सरकारविरोधात आंदोलन करत आहे. सुरूवातीला सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यात आल्याने ही संतप्त तरुणाई रस्त्यावर आली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स अशा महत्त्वाच्या प्लॅटफॉर्म्सवर सरकारने बंदी घातल्याचा निषेध करण्यात आला. राजकीय आणि सामाजिक तणाव लक्षात घेऊन नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. ओली म्हणाले, सध्या निर्माण झालेल्या समस्येवर राजकीय मार्गांनी आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघावा म्हणून मी पदाचा राजीनामा देत आहे.
आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांचं घर पेटवून दिलं. या घटनेत माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. राजलक्ष्मी असं त्यांचं नाव होतं. खनल यांचं घर पेटवून दिल्यानंतर त्यात त्यांच्या पत्नी राजलक्ष्मी या गंभीररित्या भाजल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू असून, माजी पंतप्रधानांचे घर देखील पेटवून देण्यात आले. यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. आंदोलकांनी सिंह दरबारही पेटवले.
नेपाळमधील हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि त्यात सोशल मीडियावरील बंदीनं तेल ओतल्यानं ’जेन झी’च्या संतापाचा आगडोंब उसळला. सोशल मीडिया बंदीचं निमित्त मिळालेली तरुणाई आक्रमक झाली. ती थेट संसदेत घुसली. संसदेची इमारत पेटवून दिली. दुसर्या दिवशी उद्रेक आणखी वाढला. नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झाले. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरही ही आग धुमसते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंदोलकांनी माजी पंतप्रधान झलनाथ खनल यांच्या घरालाही आग लावली. त्यात त्यांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काठमांडूच्या दल्लू परिसरात घडली. याच परिसरात माजी पंतप्रधान खनल यांचे घर आहे. ते आंदोलकांनी पेटवून दिले. आगीत माजी पंतप्रधानांच्या पत्नी राजलक्ष्मी या गंभीररित्या भाजल्या. त्यांना कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान राजलक्ष्मी यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, आंदोलकांनी केपी शर्मा ओली यांच्याही घरावर दगडफेक केली होती. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर युवा पिढीच्या संतापाचा भडका उडाला. काठमांडूमध्ये हिंसक निदर्शने झाली. आंदोलक तरुणांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवर हल्ला चढवला. संसद भवनातही घुसून तोडफोड केली.




