कुख्यात यश ऊर्फ गांधी तायडेवर एमपीडीए

अमरावती कारागृहात रवानगी

-गुन्हेगारीवर पोलिसांचे कठोर पाऊल
अमरावती / 9 सप्टेंबर : शहरातील कुख्यात सराईत गुन्हेगार यश ऊर्फ गांधी विनोद तायडे (वय 20, रा. कल्याण नगर, गल्ली क्र. 8, अमरावती) यास अमरावती शहर पोलिसांनी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटीज (एमपीडीए) कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले असून परिसरात दहशत माजवणार्‍या या गुन्हेगारावर हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
यश ऊर्फ गांधी तायडे हा दरोडा, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, घरफोडी, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शस्त्राने हल्ला करणे अशा स्वरूपाचे दहा पेक्षा अधिक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेला सराईत गुन्हेगार आहे. परिसरात तो सतत दहशत माजवत असून नागरिकांना त्रास देत होता. यापूर्वी त्याच्यावर तडीपारी व प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने गुन्हेगारी कृत्य थांबवण्याऐवजी त्यात आणखी सक्रीय सहभाग घेतल्याने अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत त्याला कारागृहात डांबले.
फ्रेजरपूरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी या गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आला. प्रस्तावावर सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सीमा दाताळकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी बारकाईने मार्गदर्शन केले. त्यानंतर एमपीडीए सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक इमरान नायकवडे, हेडकॉन्स्टेबल अजय मिश्रा, चेतन कराडे, फ्रेजरपूरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल महाजन आणि हेडकॉन्स्टेबल संदिप देशमुख यांनी ही कारवाई प्रत्यक्षात आणत प्रस्तावाची पूर्तता केली.
अमरावतीचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी 8 सप्टेंबर रोजी या संदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली. आदेश मिळताच पोलिसांनी तायडेला ताब्यात घेऊन अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवाना केले. ही कारवाई झाल्याने परिसरात काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. दरम्यान, आगामी धार्मिक सण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर आणखी कठोर प्रतिबंधक कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button