समृद्धी महामार्गावर अडिच कोटींच्या लसींची चोरी

आंतरराज्यीय टोळी गजाआड

-वाशिम पोलिसांची धाडसी कारवाई
वाशिम / 8 सप्टेंबर : समृद्धी महामार्गावर तब्बल 2 कोटी 43 लाखांच्या लसींची चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी धाडसी कारवाईत गजाआड केले असून या कारवाईत पोलिसांनी 38 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आणि सहा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे ही टोळी दुसर्‍या चोरीसाठी तयारी करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी येथून नागपूरमार्गे कोलकात्याकडे निघालेल्या कंटेनरमधून 23 जुलै रोजी 46 बॉक्समधील लस अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. कंपनीच्या तक्रारीवरून कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलिसांनी एकत्रित तपास सुरू करून तब्बल 85 हजार वाहनांची तपासणी केली आणि संशयित ट्रक शोधण्यात आला. आरोपी पुढील चोरीसाठी गोव्याला जात असताना वाशिमजवळ कारंजा परिसरात चार आरोपींना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील देवास येथील टोळीचा मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान व त्याचा साथीदार भारत घुडावद यांनाही अटक करण्यात आली. सर्व आरोपी मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. कारवाईदरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर, ट्रक, स्कॉर्पिओसह 38 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त झाला असून आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. यापूर्वी 11 गुन्हे दाखल असून पुणे पोलिसांनीही मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. सध्या सर्व आरोपींना 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक लता फड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी उपस्थित होते आणि या धाडसी कारवाईबद्दल वाशिम पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button