बावनकुळेंच्या कामठीत काँग्रेसचा ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा
भाजपविरोधात काँग्रेसचे मोठे आंदोलन

-मतचोरीच्या आरोपांवर लक्ष्य केंद्रित
-राज्यातील बडे नेते उपस्थिती राहणार
नागपूर / 2 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा उद्या, बुधवार दि. 3 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. ‘वोट चोर, गद्दी छोड’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच विधानसभा पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री सुनिल केदार, खा. श्यामकुमार बर्वे यांसह सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कामठी मतदारसंघ हा भाजपचे महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे क्षेत्र असून, या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित होते. काँग्रेस पक्षाचे नेते या मेळाव्याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करून पक्षाच्या धोरणांची माहिती पोहचवणार आहेत. काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदान प्रक्रियेत घोळ करून सत्ता मिळवली आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह मतचोरीची पोलखोल केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला होता, तसेच कामठी मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदार नोंदणीचे उदाहरण देऊन हा मुद्दा उभा राहिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, नागपूर जिल्ह्यातील कामठी हा या मोहिमेचा मुख्य फोकस बनला आहे.




