अफगाणिस्तान हादरले : 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

800 जणांचा मृत्यू, 3 हजार जखमी

-ढिगार्‍याखाली हजारो लोक, बचावकार्याला वेग
-दोन वर्षांतील सर्वात मोठा भूकंप
काबूल / 1 सप्टेंबर : अफगाणिस्तान सोमवारी पुन्हा एकदा भीषण भूकंपाच्या तडाख्याने हादरले. 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा मोठा धक्का नंगरहार प्रांतातील जलालाबादजवळ बसला. आतापर्यंत 800 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले असून 3 हजारांहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढतच जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भूकंपानंतर अनेक घरे, इमारती आणि बाजारपेठा जमीनदोस्त झाल्या. ढिगार्‍याखाली अजूनही अनेक लोक अडकले असल्याचे सांगितले जात असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचावपथके युद्धपातळीवर काम करत आहेत. दुर्गम भागातील संपर्क तुटल्यामुळे बचावकार्य अडचणीत आले आहे. मुख्य भूकंपानंतर काही वेळातच 4.7 रिश्टर स्केलचा आफ्टरशॉक बसला. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, हजारो नागरिक रात्रभर उघड्यावरच थांबले.
या प्रदेशात यापूर्वी 2023 मध्ये असा भीषण भूकंप झाला होता. त्या वेळी तालिबान सरकारने 4,000 मृतांचा दावा केला होता, तर संयुक्त राष्ट्रांनी 1,500 हून अधिक मृत्यूंची नोंद केली होती. सोमवारी झालेला हा भूकंप त्या नंतरचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. अफगाणिस्तान आधीच राजकीय, आर्थिक आणि आरोग्यविषयक संकटातून जात असताना या भूकंपाने परिस्थिती अधिक गंभीर केली आहे. तालिबान प्रशासनाने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे तातडीने मदतीचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button