जन्मदाखल्याच्या कारणावरून नागरिकांना छळ थांबवा
आ. संजय खोडके यांची पोलिसांना तंबी

-गाडगे नगर पोलीस ठाण्यात दिली धडक
अमरावती / 28 ऑगस्ट : जन्मदाखल्याच्या प्रकरणावरून नागरिकांना थांबवून ठेवणे, वारंवार पोलीस ठाण्यात बोलावणे आणि आधारकार्डांसह नोटिसा देऊन मानसिक छळ करणे योग्य नाही, हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे सदस्य आमदार संजय खोडके यांनी गाडगे नगर पोलिसांना दिला.
काही काळापूर्वी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून जन्मदाखल्यांच्या तपासणीसंदर्भात कारवाई सुरू होती. त्याअंतर्गत नागरिकांना नोटिसा देऊन पोलीस ठाण्यात बोलावले जात होते. अनेकांना तासन्तास ठाण्यात बसवून ठेवले जात होते. मजुरी करून उदरनिर्वाह करणार्या सामान्य कुटुंबांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर आमदार खोडके थेट गाडगे नगर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिसांना विचारणा करताना सांगितले की, एसआयटीच्या चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की अमरावतीत कुठलाही बांगलादेशी वा रोहिंग्या नागरिक राहत नाही. तरीसुद्धा लोकांना थांबवून ठेवणे व विनाकारण छळ करणे अमान्य आहे. ही पद्धत तातडीने थांबवली पाहिजे.
या वेळी आमदार खोडके यांच्यासोबत अॅड. शोएब खान, अॅड. शब्बीर हुसैन, सनाउल्ला ठेकेदार, आसीफ खान, हाजी रफिक, मुख्तार सौदागर, अॅड. जावेद, अबरार अहमद, सद्दामभाई यांच्यासह मुस्लिम बहुल भागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थकांसह थेट ठाण्यात पोहोचून खोडके यांनी पोलिसांना नागरिकांचा छळ तातडीने थांबविण्याचे आदेश दिले.




