अमरावतीत गणेशोत्सवाच्या सोहळ्याचा प्रचंड उत्साह

भक्तांची उत्कंठा शिगेला, शहर गणेशमय

-सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची धामधूम
-सण, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम
-सजावट, शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अमरावती / 25 ऑगस्ट : गणेश चतुर्थीच्या आगमनानिमित्त अमरावती शहर एक वेगळ्याच भक्तिमय वातावरणात न्हालं आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त उत्साहाने भारावून गेले आहेत. प्रत्येक घराघरांत सजावटीच्या तयारीची लगबग सुरू आहे. 27 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवासाठी शहर सज्ज झाले आहे.
गणेशोत्सवाला पारंपरिक रंग देण्यासाठी यंदा ढोल-ताशा पथकांच्या गजराने शहर भारावून जाणार आहे. डीजेला कायमचा रामराम ठोकून परंपरेच्या लयीत गणेशभक्त बाप्पाच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. तालबद्ध नाद वातावरणात आनंद आणि ऊर्जा ओतून टाकत आहे. गांधी चौक, रविनगर आणि रेल्वे पुल परिसरात गणेशमूर्ती व सजावटीच्या सामानासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. दगडूसेठ, लालबागचा राजा, बालगोपाळ अशा मोहक रूपातील बाप्पाच्या मूर्ती लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. सजावटीसाठी खास सिंहासनांवर ग्राहकांचा ओघ वाढला असून, दुकानदारांचेही चेहरे आनंदाने उजळले आहेत.
अमरावतीतील विविध सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव भव्यतेने साजरा करण्याची तयारी पूर्ण केली आहे. शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजबंध दृढ करणारे उपक्रम यांच्या माध्यमातून हा सोहळा धार्मिकतेसोबतच सामाजिक ऐक्याचाही संदेश देणार आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव राहिला नाही, तर तो आज सामाजिक ऐक्य, परंपरा आणि संस्कृती यांचा महामेळा बनला आहे. बाप्पाच्या स्वागताने अमरावती पुन्हा एकदा एका दिव्य, मंगलमय वातावरणाने झळकू लागली आहे. भाविकांच्या असीम श्रद्धा आणि उत्साहामुळे यंदाचा अमरावतीचा गणेशोत्सव अविस्मरणीय ठरणार यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Back to top button