निंभी येथील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या
शाळेच्या बांधकाम स्थळी घेतला गळफास

मोर्शी / 24 ऑगस्ट : मोर्शी तालुक्यातील निंभी गावात आज 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जिल्हा परिषद शाळेच्या शौचालय बांधकामस्थळी उघडकीस आली आणि परिसरात खळबळ उडाली. शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील निंभी येथील रोहित संजय इंगळे (वय 23) असे मृतकाचे नाव असून तो ऍक्सिस बँकेत बचत गटाचे काम करीत होता.
रोहितने कर्जाऊ रक्कम घेऊन मोटारगाडीची खरेदी केली होती. गाडीची हफ्त्यांची चिंता त्याला नेहमी सतावत असल्याचे बोलले जात असले तरी आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द केले. या घटनेचा पुढील तपास शिरखेडचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विनोद मनोहरे यांच्याकडून सुरू आहे.




