उपराष्ट्रपती पदाची महालढत: राधाकृष्णन विरुद्ध रेड्डी
भाजपची धावपळ, आघाडीचे टेन्शन वाढले

नवी दिल्ली/ 22 ऑगस्ट : भाजपचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि काँग्रेस-इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्या लढतीमुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडे संख्याबळ असलं तरी क्रॉस व्होटिंगचा धोका आणि प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा ही एनडीएसाठी डोकेदुखी ठरणारी सूत्रं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदारांचे मतसंघटन पक्कं करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला. मात्र शरद पवार यांनी विचारांचा प्रश्न सांगत भाजपच्या विनंतीला नकार दिला. दुसर्या बाजूला ठाकरे सेनेने काँग्रेस उमेदवार रेड्डींना पाठिंबा जाहीर केला आणि उलट भाजपची मतं फुटण्याचा इशाराच दिला.
लोकसभेत एकूण 542 खासदारांपैकी भाजपचे 240, एनडीएचे 292, इंडिया आघाडीचे 234 आणि अन्य 17 खासदार आहेत. राज्यसभेत प्रभावी मतं 233. यात एनडीएकडे 128, तर इंडिया आघाडीकडे 105 मतं आहेत. एकत्रित दोन्ही सभागृहांचा विचार केला तर विजयासाठी आवश्यक बहुमत 393 मतांचं आहे. एनडीएकडे सध्या 420 मतांचं बळ दिसतंय, तर इंडिया आघाडी 339 वर उभी आहे. संजय राऊत यांनी सरळ सांगितलंय की क्रॉस व्होटिंग होणारच. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील समीकरणं भाजपसाठी कठीण आहेत. चंद्रबाबू नायडूंचे 16, वायएसआरचे 4, एमआयएमचा 1 आणि जनसेवेचे 2 खासदार मिळून काही नाराजी दाखवली तर एनडीएच्या विजयात अडथळा निर्माण होऊ शकतो. 13 नाराज खासदारांनी बाजू बदलल्यास राधाकृष्णन यांचा पराभवही शक्य आहे.
गणित सध्या एनडीएकडे झुकलेलं असलं तरी इंडिया आघाडीकडून प्रादेशिक अस्मिता, वैचारिक लढा आणि नाराजी यांचा विशेष वापर होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे 9 सप्टेंबरची निवडणूक ही फक्त आकड्यांची नव्हे तर राजकीय डावपेचांचीही सरशी ठरणार आहे. सद्यस्थितीत राधाकृष्णन यांचं पारडं जड मानलं जात असूनही, रेड्डींची उमेदवारी निवडणुकीच्या रंगमंचावर नवा ट्विस्ट निर्माण करून भाजपच्या विजयाला आव्हान देत आहे.




