मेघा नदीच्या महापुराने शिरजगाव कसबा जलमय

2007 नंतर तब्बल 18 वर्षांनी पुनरावृत्ती

-नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान
-व्यापारी, शेतकर्‍यांना मोठा फटका
चांदूर बाजार / 19 ऑगस्ट  : सातपुडा पर्वतरांगांमध्ये सलग झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आता चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा परिसराला बसला आहे. मेघा नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे गाव व बाजारपेठ जलमय झाली असून नागरिकांचे, शेतकर्‍यांचे आणि व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तब्बल 18 वर्षांपूर्वी 2007 मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती यावर्षी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
महापुरामुळे शिरजगाव कसब्यातील आठवडी बाजार, धान्य दुकानं, भाजीपाला व कोल्ड्रिंक्स व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापार्‍यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी आयुष्यभराची पुंजी या व्यवसायात गुंतवली होती. गावातील धाकडीपुरा, चुनारपुरा व इतर वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घरात घुसले. त्यामुळे धान्यसाठा, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. काही कुटुंबांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे.
सध्या महसूल विभाग, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन पुरग्रस्त भागात पोहोचून मदतकार्य करत आहे. तरीदेखील गावकर्‍यांच्या मते, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी अपुरी असल्याचे दिसून आले आहे. तातडीने मदत, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व नुकसान भरपाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. हवामान खात्याने सातपुडा व विदर्भात पुढील 48 तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मेघा नदीतील पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने सतर्कता बाळगणे आवश्यक ठरणार आहे.
हा पूर फक्त एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसरासाठी इशारा समजला जात आहे. हवामान बदल, अनियंत्रित पाऊस व पुरनियोजनाच्या अभावामुळे ग्रामीण भागावर संकटे कोसळत आहेत. शिरजगाव कसब्यातील नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून योग्य नुकसानभरपाई, तसेच दीर्घकालीन दृष्टीने पूरनियंत्रणाची पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशा आपत्ती अधिक तीव्रतेने समोर येतील, असे बोलले जात आहे.
-पूलावरुन धोकादायक प्रवास
शिरजगाव कसबा गावानजीक मेघा नदीवर असलेल्या मोठ्या पुलाचे सुरक्षा कठडे महापुराच्या पाण्याने वाहून गेले. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणार्‍यांचा जीव धोक्यात आला आहे. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. प्रशासनाने पुल बंद करून पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच नदीकाठावर व पुलावर पुर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करित आहेत. प्रशासनाने वारंवार इशारे देऊनही ही गर्दी कमी होत नाही. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
-पीक गेले वाहून
गावातील शेतजमिनीही पाण्याखाली गेल्या आहेत. सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतजमीन वाहून गेल्याचे चित्र आहे. सततचा पाउस आणि पूराचा फटका बसून शेतकर्‍यांसमोर पुन्हा कर्जबाजारी होण्याचे संकट उभे ठाकले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button