जिल्ह्यात 1,900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे

384 गावांत ‘एक गाव, एक गणपती’

-27 ऑगस्टपासून दहा दिवसांचा उत्सव
-पोलीसांचे 80 टक्के मनुष्यबळ सुरक्षेसाठी सज्ज
अमरावती / 19 ऑगस्ट : जिल्ह्यात गणेशोत्सवाची प्रतिक्षा लवकरच संपणार असून 27 ऑगस्टपासून सर्वांना हव्याहव्याशा ‘बाप्पा’च्या स्वागताची सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. मुर्तिनिर्मात्यांच्या हाताखालची शेवटची घडी गतीमान झाली आहे, तर प्रशासन व पोलीस यंत्रणा उत्सवाचे नियोजन युद्धपातळीवर करत आहेत. यंदा जिल्ह्यात तब्बल 1,900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करणार असून 384 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ ची संकल्पना साकार होणार आहे.
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात गतवर्षी 582 मंडळे अस्तित्वात होती. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे औचित्य साधत मंडळांची संख्या आणखी वाढेल, असा अंदाज आहे. शहरालगतच्या 37 ग्रामपंचायतींनी गतवर्षी ‘एक गाव, एक गणपती’ची अंमलबजावणी केली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील 14 तालुके, 31 पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रांत 1,318 मंडळांची नोंद झाली होती, त्यापैकी तब्बल 347 गावांनी सामूहिक गणेशोत्सवाचा मार्ग अवलंबला होता.
यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम असल्यामुळे गणेशोत्सवाचे स्वरूप कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्सवाचे स्वरूप सामाजिक व धार्मिक उत्साहाबरोबर राजकीय वातावरणाची चुणूक दाखवणारे ठरेल, अशी चर्चा आहे. दरवर्षीप्रमाणे दहा दिवसीय उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवणे हे पोलीस यंत्रणेपुढील मोठे आव्हान ठरते. त्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यानिहाय बैठकांद्वारे मंडळ पदाधिकार्‍यांशी समन्वय साधला जात आहे. विभागनिहाय चर्चासत्रे घेऊन सर्वंकष नियोजन सुरू आहे.
गोपनीय विभागाने संवेदनशील ठिकाणांची यादी तयार केली असून असामाजिक घटकांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई गतीमान करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात शहर व ग्रामीण पोलीस दलातील सुमारे 80 टक्के मनुष्यबळ थेट बंदोबस्तात तैनात राहणार आहे. यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणेच जिल्हा गणेशमय होणार असून मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती अभियानांमुळे वातावरणात रंगत येणार आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता उत्सव पार पडावा यासाठी प्रशासनाने सर्व विभाग सज्ज केले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button