एनडीएचे राधाकृष्णन विरुद्ध आघाडीचे तिरुची शिवा?

तमिळनाडूतूनच उपराष्ट्रपती! काँग्रेसचा ‘चालाख डाव’

नवी दिल्ली/ 18 ऑगस्ट : देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय पटावरील मोहरे आता जोरदारपणे हलू लागले आहेत. एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनेही मोठा डाव साधण्याची तयारी केली आहे. इंडिया आघाडीकडून डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील प्रभावी खासदार तिरुची शिवा यांचे नाव सर्वात पुढे आहे. ही निवडणूक तमिळनाडूतील दोन नेत्यांमधील जणू युद्धच ठरणार आहे.राधाकृष्णन आणि शिवा दोघेही दक्षिणेतील चेहरे असल्याने निकाल काहीही लागला तरी उपराष्ट्रपती पदी तमिळनाडूचाच नेता विराजमान होणार, हे स्पष्ट होत आहे. काँग्रेससाठी शिवा यांची उमेदवारी ही दोन टोकं साधणारी तलवार ठरू शकते. एका बाजूला भाजपच्या तमिळनाडूतील रणनीतीला सुरूंग घालणं, तर दुसर्‍या बाजूला डीएमकेला बळ देणं. त्याचबरोबर सतत नाराजी व्यक्त करणार्‍या तृणमूल काँग्रेस, आप यासारख्या मित्रपक्षांनाही यामुळे जवळ आणता येणार आहे. डीएमकेच्या दिल्लीतील रणनीतीकारांमध्ये शिवा यांचा मोठा दबदबा आहे. संसदेतलं त्यांचं मांडणीचं कौशल्य आणि राजकीय डावपेच यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे केवळ तमिळनाडूत नाही, तर राष्ट्रीय स्तरावरही आघाडीची एकजूट ठळकपणे दिसून येईल. संख्याबळाच्या गणितावरून पाहिलं तर राधाकृष्णन यांचा विजय सुनिश्चित मानला जात आहे. पण तिरुची शिवा मैदानात उतरले तर ही लढत म्हणजे निकालासाठी नव्हे, तर राजकीय संदेश देण्यासाठीची खेळी ठरेल. आघाडी एकसंध आहे, काँग्रेस मित्रपक्षांना न्याय देतेय, हा संदेश देशभर पसरविण्यात काँग्रेस यशस्वी होऊ शकते.

संबंधित बातम्या

Back to top button