लाडकी बहीणनंतर आता ‘लाडकी सून’
शिंदे गटाचा पुढाकार, हुंडाबळीला आळा घालण्यासाठी अभियान

मुंबई / 18 ऑगस्ट : महाराष्ट्राला हादरवून टाकणार्या वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर समाजातली वेदनादायी वास्तवता पुन्हा एकदा उघड झाली. पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही हुंडाबळीच्या घटना होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. या घटनांनी घर हेच सुरक्षिततेचं कवच हा समज चुराडा केला. स्वतःच्या घरातच छळ आणि जाच सहन करणार्या सुनांच्या सुरक्षेसाठी आता शिव सेना शिंदे गटाने नवं अभियान उचललं आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभि यानाची घोषणा करताना सांगितलं की, महाराष्ट्राच्या लेकी-सुना सुरक्षित, तर महाराष्ट्र सुरक्षित. प्रत्येक घरातली सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. तिच्यावरचा अन्याय हा समाजासाठी कलंक आहे. अशी वृत्ती ठेचून काढली पाहिजे. जो छळ करेल, त्याला शिवसेना स्टाईलमध्ये धडा शिकवला जाईल. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील प्रत्येक शिवसेना शाखा आता लाडक्या सुनांचं माहेर ठरणार आहे.




